सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रमी प्रकरणाचा जोरदार निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पत्त्याचा डाव मांडून जाहीर निषेध करण्यात आला. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमध्ये कृषिमंत्री यांच्या राजीनामाची जोरदार मागणी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, विजयराव बोबडे, उमेश देशमुख, प्रशांत भोसले, मंगेश ढाणे, अतुल शिंदे, आरती काळंगे, संदीप धुमाळ, मेघा नलवडे, गोरखनाथ नलावडे, अंजली रजपूत इत्यादी राष्ट्रवादी सदस्य सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, गेल्या 15 मे पासून सुरू झालेल्या पावसाने उसंत घेतलेली नाही. खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. केवळ 29 टक्के पेरण्या झाल्या आहेत. 2 लाख 37 हजार 797 क्षेत्र पाण्यात आहे. याची दखल घेवून शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना हेक्टरी 50 हजाराची मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
सभागृहामध्ये महायुती सरकारचा खरा चेहरा पुढे आला आहे. शेतकरी संकटात असताना सभागृहात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभेत जंगली रमी खेळताना चा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट आहे. शेतकर्यांचे प्रश्न प्रलंबित असताना कृषी व्यवस्था करून त्यांना न्याय मिळत नाही. शेतकर्यांच्या भावना तीव्रतेने दुखावल्या असून कोकाटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच पत्त्यांचा डाव मांडून अभिनव आंदोलन केले.