मारूल हवेली : कराड-पाटण मार्गावर दिंडुकलेवाडी येथे भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार झाली तर पती जखमी झाला. हा अपघात मंगळवार दि.13 रोजी घडला असून सदर घटनेची नोंद मल्हारपेठ पोलिस ठाण्यात झाली आहे.
सरिता नाना देसाई (वय 57) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर त्यांचे पती नाना परशुराम देसाई (वय 60 येराडवाडी ता.पाटण) हे जखमी झाले आहेत. ते कामानिमित्त मल्हारपेठ येथे जाताना अपघात झाला.
मल्हारपेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना देसाई हे पत्नी सरिता यांच्या सोबत मोटारसायकल (एम.एच.50 वाय 0967) वरून जात होते. कराड-पाटण मार्गावरील दिंडुकलेवाडी गावच्या हद्दीत सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास चारचाकीने (एम.एच.42 एम 2468) त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात सरिता देसाई यांच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर नाना देसाई हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर चालक पळून गेला.