मुंबई : अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी चळवळ निस्वार्थपणे उभारली. लाखो माथाडी कामगारांचे भविष्य उज्ज्वल केले. आज निस्वार्थ भावनेने ही चळवळ कार्यरत आहे. या चळवळीची पाळेमुळे खोलवर असून या चळवळीला कोणी रोखू शकत नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तुर्भे, नवी मुंबई येथील कांदा, बटाटा मार्केटमध्ये स्व.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित माथाडी कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी वन मंत्री गणेश नाईक, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्रीछत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, प्रशांत ठाकुर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मनोज जामसुतकर, माजी.खा.संजीव नाईक, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष व संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व संघटनेचे कार्याध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नाबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, समाजाला न्यायालय स्तरावर तसेच शासनामार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. सारथी संस्थेमार्फत मराठा समाजाचे हजारो अधिकारी तयार झाले.
नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न, बाजार समितीतील मार्केटमध्ये चालणारा किरकोळ व्यापार, वडाळा गृहनिर्माण प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी माथाडी कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन केले. मेळाव्यामध्ये 17 गुणवंत माथाडी कामगारांचा माथाडी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारण्यासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.
यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय देशमुख, रूनवाल ग्रुपचे सुबोध रूनवाल, भाजपाचे नवीमुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील, कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ जाधव, आनंद पाटील, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील,अॅड.सौ भारतीताई पाटील, उपाध्यक्ष सुर्यकांत पाटील, माथाडी पतपेढीचे व्यवस्थापकीय संचालक रमेश पाटील, माथाडी हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. हणमंतराव पाटील, प्राना फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ. प्राची पाटील, नवी मुंबईतील नगरसेवक, बाजार समितीचे पदाधिकारी तसेच व्यापारी प्रतिनिधी व माथाडी कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन संघटनेचे संयुक्त सरचिटणीस पोपटराव देशमुख यांनी केले.