पुसेसावळी : गिरिजाशंकरवाडी-राजाचे कुर्ले (ता. खटाव) येथील श्री गिरिजाशंकर मंदिर तीर्थस्थळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनांतर्गत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेमधून ‘ब’ दर्जा प्राप्त झाला आहे.
श्री गिरिजाशंकर देवस्थान हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले मंदिर आहे. याठिकाणी प्रत्येक सोमवार, मासिक शिवरात्री, महाशिवरात्री, संपूर्ण श्रावण महिना व वर्षभर पश्चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक येत असतात. शासनाने ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्री क्षेत्र गिरिजाशंकर देवस्थानाला ‘ब’ दर्जा द्यावा, यासाठी अनेक वर्षांपासून भाविकांसह परिसरातील ग्रामस्थांची मागणी होती. जिल्ह्याच्या दृष्टीने धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाचे महत्त्व असलेल्या या देवस्थानाचा विकास तीर्थस्थळाच्या ‘ब’ वर्ग दर्जामुळे करता येणार आहे. त्यामुळे ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा, यासाठी देवस्थान व ग्रामस्थांचे प्रयत्न सुरू होते. त्यास अखेर यश आले आहे.
यासाठी ग्रामविकास व पंचायतराजमंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, वर्धन अॅग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशील कदम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता..
मागील महिन्यात पुसेसावळी येथील जाहीर सभेत धैर्यशील कदम व विक्रमशील कदम यांनी मंत्री गोरे यांच्याकडे श्री गिरिजाशंकर देवस्थानास ‘ब’ वर्ग दर्जा देण्याची मागणी केली होती. त्या वेळी मंत्री गोरे यांनी विकासकामासंदर्भात कदम बंधूंना दिलेला शब्द पाळला असून, दोन महिन्यांतच ‘ब’ वर्ग दर्जा व पाच कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले होते. आज प्रत्यक्षात मंत्री गोरेंनी कदम बंधूंना दिलेला शब्द पूर्ण केला.