साताऱ्यातील वाढत्या गुन्हेगारीवर विधान परिषदेत खडाजंगी; कोरेगाव पोलीस ठाण्याच्या चौकशीचे सरकारकडून आश्वासन

सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण

by Team Satara Today | published on : 18 March 2026


सातारा :  जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवरून बुधवारी विधान परिषदेत जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा ठामपणे उपस्थित करत कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आमदार शिंदे यांनी कोरेगावचे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप करत त्यांच्या चौकशीची आणि आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी सभागृहात केली. जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

या चर्चेला उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा सभागृहात सादर केला. त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण, तपासाची गती आणि विविध प्रतिबंधात्मक कारवाई याबाबत आकडेवारी वाचून दाखवत पोलीस यंत्रणा प्रभावीपणे काम करत असल्याचा दावा केला.

तसेच, राज्याचे पोलीस महासंचालक यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत यापूर्वीच क्लीन चीट दिल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली. मात्र, आमदार शिंदे यांनी मांडलेल्या मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्यांच्या तक्रारीच्या आधारे पुन्हा एकदा सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले.

गृहराज्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न व्यक्त करता आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली. मी केलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूने नसून पुराव्यानिशी आहेत. जर माझे आरोप चुकीचे ठरले, तर मी सभागृहात माफी मागण्यास तयार आहे, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. यामुळे या प्रकरणाला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले.

दरम्यान, या मुद्द्यावरून सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पोलीस यंत्रणेतील त्रुटींवर प्रकाश टाकला, तर सरकारने आकडेवारीच्या आधारे आपली बाजू ठामपणे मांडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; युवकावर पोस्कोचा गुन्हा दाखल
पुढील बातमी
किल्ले रायगडावर शौर्य-अभिमान दिवस उत्साहात; समशेरबहाद्दर राजर्षी खंडेराव बर्गे यांच्या पराक्रमास अभिवादन

संबंधित बातम्या