पुणे : समान नागरी संहितेबाबत जनसुनावणीत समाजातील सर्व घटकांकडून मांडण्यात आलेली मते, अपेक्षा आणि सूचनांचा विचार समितीच्या शिफारशींमध्ये करण्यात येईल, अशी ग्वाही समान नागरी संहिता विषयक समितीने दिली. राज्यभरात या विषयाच्या अनुषंगाने विभागास्तरावर जनसुनावणी घेण्यात येत असून महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संस्था, विविध संघटना तसेच कायदेविषयक क्षेत्रातील जाणकारांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही समितीने केले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात समान नागरी संहिता विषयक जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जनसुनावणी समितीचे सदस्य माजी मुख्य सचिव दिनेशकुमार जैन, माजी महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ प्रत्यक्ष तर उत्तराखंडचे माजी मुख्य सचिव शत्रुघ्न सिन्हा दूरदृष्यप्रणालीद्वारे तसेच पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सहआयुक्त तुषार ठोंबरे,विधी व न्याय विभागाचे सहसचिव किशोर शिंदे, उपसचिव सुजित बोरकर आदी उपस्थित होते.
समितीने समान नागरी संहितेचे व्यापक स्वरूप स्पष्ट करताना भारताची विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असलेली ओळख जपत नागरिकांच्या वैयक्तिक व कौटुंबिक जीवनाशी संबंधित नागरी बाबींमध्ये समानता, न्याय, सुसूत्रता आणि कायदेशीर स्पष्टता असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समिती प्रामुख्याने विवाहासंबंधी कायदेशीर वय, नोंदणी, वैवाहिक हक्क व जबाबदाऱ्या; घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया, कारणे व संबंधित पक्षांचे अधिकार आणि संरक्षण; वारसा व उत्तराधिकार; तसेच लिव्ह-इन रिलेशनशिपमधील व्यक्तींचे कायदेशीर अधिकार, जबाबदाऱ्या आणि संरक्षण या चार विषयांचा अभ्यास करणार असल्याचे समितीने यावेळी स्पष्ट केले.
धार्मिक स्वातंत्र्याचा आधार राखून नागरी व कौटुंबिक कायदेशीर बाबींमध्ये समानता आणि न्याय साधणारी संतुलित चौकट विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रस्तावित कायद्याचे स्वरूप निश्चित करताना समितीचा अभ्यास, नागरिकांच्या सूचना आणि संविधानिक तरतुदी विचारात घेतल्या जातील. त्यामुळे इच्छुक प्रत्येक नागरिकाने आपले अनुभव, मते आणि सूचना मांडाव्यात, असेही यावेळी सांगण्यात आले.
जनसुनावणीत विभागातील पाचही जिल्ह्यांतील नागरिकांनी प्रत्यक्ष व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या ठिकाणाहून दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित राहून आपली मते मांडली. या जनसुनावणीमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना, समाजघटकांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी समान नागरी संहितेशी संबंधित महत्त्वपूर्ण विषयांवर आपले अभिप्राय, सूचना आणि अपेक्षा समितीसमोर सादर केल्या.
ऑनलाइन पद्धतीने मते नोंदवू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी समितीच्या अधिकृत समान नागरी संहिताविषयक https://ucc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ३७ मुद्द्यांच्या माध्यमातून अभिप्राय सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन माध्यमातून मते मांडण्यासाठी १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढविण्यात आली असल्याची माहितीही समितीने यावेळी दिली.
पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर,सांगली जिल्ह्यांतील नागरिकांचा समान नागरी संहितेच्या जनसुनावणीत सहभाग; मते, सूचना, प्रश्न, अपेक्षा ऑनलाईन मांडण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
by Team Satara Today | published on : 29 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा