जोपर्यंत मतदार याद्या व्यवस्थित शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत; प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे; महाविकास आघाडीची ठाम भूमिका

by Team Satara Today | published on : 26 October 2025


कोरेगाव : राज्यातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ घालण्यात आला असून, या घोळांमुळे निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आली आहे. या संदर्भात अनेक ठोस पुरावे राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करूनही आयोगाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. जोपर्यंत मतदार याद्या व्यवस्थित शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत, ही महाविकास आघाडीची प्रमुख मागणी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरेगाव मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक रविवारी गीताई मंगल कार्यालयात पार पडली. या बैठकीत आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, बाजार समितीचे माजी सभापती ॲड. पी. सी. भोसले, अरुण माने, खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार शिंदे पुढे म्हणाले, मतदार याद्यांमधील घोळांविरोधात महाविकास आघाडी लवकरच राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे. सत्ताधारी पक्ष मतदार याद्यांमध्ये फेरफार करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. मुंबई येथे राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयासमोर १ नोव्हेंबर रोजी या विषयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

सत्ताधारी मंडळी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी निवडणुका लावू शकतात. त्यामुळे पक्षाने त्यासाठी पूर्ण तयारी ठेवली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पूर्ण ताकदीने लढविणार आहे. महाविकास आघाडी या निवडणुकीत निश्चित विजय मिळवेल, असा ठाम विश्वास देखील आ. शिंदे यांनी व्यक्त केला.

सध्याच्या महायुती सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी असून, सर्वसामान्यांना प्रत्येक गोष्टीत त्रास होत आहे. अशा परिस्थितीत जनतेला दिलासा देण्यासाठी निवडणुका हे महत्त्वाचे माध्यम ठरतील, असे आ. शिंदे यांनी सांगितले. त्यांनी कार्यकर्त्यांना ग्रामपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले. बैठकीत विविध प्रमुख पदाधिकारी, स्थानिक नेते आणि इच्छुक उमेदवार उपस्थित होते. सर्वांनी आपल्या मनोगतातून पक्षाच्या विजयासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

नोव्हेंबरमध्ये कोरेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा

कोरेगावचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या चुकीच्या कारभारामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. राजकीय भूमिकेतून आणि राजकीय द्वेषभावनेतून निरापराध कार्यकर्त्यांवर विनाकारण खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. आपल्याला राजकारणात अडचण ठरतील म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द संपविण्याचा प्रयत्न पोलीस दलामार्फत सुरू आहे. त्यास सर्वस्वी बल्लाळ हे जबाबदार आहेत. त्यामुळे पोलीस दलाच्या कारभाराचा पंचनामा करण्यासाठी सोमवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता कोरेगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही आ. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा
पुढील बातमी
प्रतापराव भोसले हे जिल्ह्याचे प्रेरणास्रोत; विजय वेळे, भुईंजमध्ये विविध उपक्रमांनी भाऊंची जयंती साजरी

संबंधित बातम्या