कोरेगाव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी ही एकत्रितपणे उतरून निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. मुंबईत मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आगामी निवडणुकांबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रत्येक जिल्हाध्यक्षांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला आहे. चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला असेल, मात्र तो स्थानिक परिस्थितीवर आधारित अपवाद असेल. कोल्हापूरसह राज्यातील इतर ठिकाणी मात्र महाविकास आघाडी ताकदीने आणि संघटितपणे लढेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरील प्रतिसाद पाहूनच निर्णय घेतले जातील. आम्ही सध्या निवडणुकीवरच फोकस केलेला असून, शरद पवार यांच्या सूचनेनुसार आघाडीला प्राधान्य देऊन रणनिती आखली आहे. पक्षाकडून या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे आणि नवीन चेहऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही केवळ राजकीय सोयीसाठी नव्हे, तर लोकशाही मजबूत करण्यासाठी आणि भाजपच्या एकपक्षीय प्रवृत्तीला उत्तर देण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही त्यांनी सांगितले.