सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा पहिलाच निकाल चुरशीचा ठरला आहे. पाटण सोसायटी गटातून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपचे नेते आणि विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह पाटण तालुक्यात तब्बल ४२ वर्षांनंतर जिल्हा बँकेत पुन्हा एकदा देसाई गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
पाटण विकास सेवा सोसायटी गटात महायुतीतील दोन प्रमुख घटक पक्षांमध्येच थेट लढत पाहायला मिळाली होती. या गटातील १०३ वैध मतदारांपैकी ५८ मतदारांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या बाजूने मतदान करत त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला. निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच देसाई यांनी ५८ मतदारांचे भक्कम पाठबळ असल्याचा दावा केला होता. या अटीतटीच्या लढतीत विद्यमान संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
४२ वर्षांनंतर पुनरागमन
गेल्या चार दशकांहून अधिक काळ म्हणजेच तब्बल ४२ वर्षे या मतदारसंघात विरोधी गटाचे वर्चस्व राहिले होते. मात्र, शंभूराज देसाई यांनी आता विजय मिळवला आहे. निकाल जाहीर होताच देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. मंत्री शंभूराज देसाई यांच्या या विजयामागे त्यांचे सुपुत्र यशराज देसाई यांनी आखलेली रणनीती निर्णायक ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे
पाटणमध्ये तब्बल ४२ वर्षांनंतर देसाई गटाचा झेंडा; भाजपच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव करत मंत्री शंभूराज देसाई विजयी
by Team Satara Today | published on : 03 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा