शाहूपुरी मध्ये परप्रांतियांच्या धुडगुसाने नागरिक भयभीत

पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा : स्थानिक पातळीवर नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी घर मालकांनी भाडेकरू ठेवताना त्याची संपूर्ण माहिती पोलीस ठाण्यास देणे बंधनकारक असताना शाहूपुरी मधील अनेक कॉलनींमध्ये सध्या कोणतीही माहिती न देता परप्रांतीय भाडेकरू ठेवले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. धुलीवंदनाच्या दिवशी शाहूपुरी मधील अनेक कॉलनीमध्ये आलेल्या टोळक्यांनी नशा पान करून धुडगूस घातला. यामुळे शाहूपुरीतील अनेक कॉलनीमधील स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या भागात लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

भयावह म्हणजे, एका वयोवृद्ध जोडप्याच्या दारातच भांग पिऊन टोळक्याने ठिय्या मांडल्यामुळे त्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल झाले होते. गेल्या वर्षी असाच धुलीवंदनाच्या दिवशी खूप मोठी काही टोळक्यांमध्ये हाणामारी झाली होती. ही हाणामारी स्थानिकांनी जीव धोक्यात घालून सोडवली होती. तरीसुद्धा यावर्षी एकमेकांच्या अंगावरील कपडे फाडून काहीजण मोकाट हिंडत होते. त्यामुळे कॉलनीमधील महिलावर्ग घरातून बाहेर पडत नाही. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांनी या धुडगुसाबाबत चिंता व्यक्त केली आहे.

शाहूपुरी मधील काही कॉलनींमध्ये मूळ मालक राहत नाहीत. परंतु जागेवर राबता रहावा म्हणून ते परप्रांतीय भाडेकरू ठेवत आहेत.  नियमित भाडे मिळते, पण स्थानिक पोलीस ठाण्यात त्याबाबत माहिती देण्याचे घरमालक टाळत आहेत.

 जणू काही पोलीस यंत्रणा घर मालकावरती गुन्हा दाखल करण्यासाठी नोंद घेण्यास सक्षम नाहीत, असेच काही मूळ मालक समजत आहेत. तर काही स्थानिक व्यापार्‍यांनी आमचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही त्याबाबत बोलू शकत नाही. असे सांगून हात झटकले आहेत.

या सर्व गोष्टीचा मानसिक व शारीरिक त्रास स्थानिक नागरिकांना होऊ लागलेला आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेने सारख्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नागरिकांनी भेट घेऊन निवेदन दिले, तर मात्र पोलिसांनी त्याबाबत हस्तक्षेप करू नये, अशी विनंती करण्यात आलेली आहे. जर भाडेकरूंची माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात देण्याचा नियमच कोण पाळत नसतील तर हा नियम तरी कशाला ठेवलाय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

यामध्ये काही प्रामाणिक व होतकरू आणि मनमिळावू स्वभावाचे परप्रांतीय राहत आहेत. गेले अनेक महिने ते राहत असले तरी त्यांचा कुणालाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. उलट सार्वजनिक उत्सवामध्ये ते हिरारीने भाग घेतात. त्याच्याबद्दल कुणाचीही तक्रार नाही. परंतु, काही बाहेरून नशापान करणारी अनोळखी गँग स्थानिकांवर दहशत माजवत आहेत. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सक्रिय सहभाग घेतला तर मात्र पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखवू नये, अशीही विनंती काही कॉलनीतील नागरिकांनी केलेली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
काशिनाथाच्या नावानं चांगभलं च्या गजरात बावधनचे शेकडो ग्रामस्थ जलमंदिरावर
पुढील बातमी
समाजभुषण - दलितमित्र स्व. शिवराम माने गुरूजी यांच्या अर्धपुतळ्याचे उद्या अनावरण

संबंधित बातम्या