जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पुन्हा सुरू झाला; कोयना पाणलोट क्षेत्रातही उघडझाप, धरणसाठ्यात अल्प वाढ

by Team Satara Today | published on : 18 July 2026


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दडी मारलेला पाऊस पुन्हा सुरू झाला असून गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरमध्ये २२, नवजा १५ तर सांडवली धबधबा येथे ९२ मिलिमीटरची नोंद झाली. तसेच कोयना पाणलोट क्षेत्रातही उघडझाप सुरू असलीतरी धरणसाठ्यात अल्प वाढ झालेली आहे. त्यामुळे कोयनेतील पाणीसाठा ५३.७६ टीएमसी झाला होता. तर सातारा शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण तयार होते.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या पश्चिम भागात अतिवृष्टी झाली होती. सलग सहा दिवस धो-धो पाऊस कोसळला. यामुळे नदी, नाले एक झाले. रानावनात पाणी साठले. तसेच घाटमार्गात दरडी कोसळल्या, झाडे पडली. काही भागात तर भूस्खलन झाल्याने लोकांना स्थलांतरित करावे लागले. सहा दिवसांच्या काळात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान झाल्याने प्रमुख धरणांतही चांगला पाणीसाठा झाला.

कोयनासारख्या मोठ्या धरणांतही ५० टीएमसीवर साठा गेला. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरणांमध्येही पाणी आवक झाली. पण, १० जुलैपासून पावसाने ब्रेक घेतला होता. जिल्ह्यात कोठेही पाऊस झाला नाही. मात्र, १५ जुलैपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. या पावसात जोर नसला तरी आशादायी वातावरण आहे.

जिल्ह्यात बुधवारी सातारा शहरासह पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली भागात चांगला पाऊस पडला. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. गुरुवारीही सकाळच्या सुमारास पश्चिम भागात पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे २१ आणि महाबळेश्वरला २२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झालेली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात ३ हजार ३९१ क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरण साठ्यात अल्प वाढ झाली. सकाळी साठा ५३.७६ टीएमसी झाला होता.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
न्यायालयाने रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले नव्हते; रिपोर्ट का लपवताय? सोनम वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची पत्नीची मागणी
पुढील बातमी
धमक्यांना घाबरत नाही, आता मी स्वतः दिल्लीला जाणार - अभिजित दिपकेंच्या वडिलांचा निर्धार, आंदोलकांच्या मागण्यांमध्ये काहीही वावगे नाही

संबंधित बातम्या