महायुतीसाठी दोनदा पुढाकार घेतला, पण प्रतिसाद नाही, त्यामुळे आता पुढाकार घेण्याचा प्रश्नच नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई

by Team Satara Today | published on : 25 January 2026


कोयनानगर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाटण तालुक्यातील कोयनानगरजवळील येराड येथे महायुतीच्या प्रचाराचा दणदणीत शुभारंभ झाला. यावेळी शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला. कार्यक्रमामुळे परिसरात निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलेलं दिसून आलं.

या वेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीबाबत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले की, जिल्ह्यात महायुती व्हावी म्हणून पालकमंत्री म्हणून मी दोन वेळा स्वतः पुढाकार घेतला. मात्र समोरून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता पुढाकार घेण्याचा प्रश्नच नाही, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

सभेत बोलताना शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही केवळ भाषणं करत नाही, तर काम करून दाखवतो. रस्ते, पाणी, वीज, साकव, संरक्षण भिंती हे सगळं कागदावर नाही, तर जमिनीवर दिसतंय. विरोधकांकडे बोलायला शब्द आहेत, आमच्याकडे दाखवायला काम आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना सुनावले.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, पाटण तालुक्याचा विकास हा लोकनेते साहेबांच्या विचारांची देण आहे. त्या विचारांवरच आम्ही उभे आहोत. मंत्री झालो तरी मी सामान्य माणसापासून दूर गेलेलो नाही. जनतेचा विश्वास हेच माझं भांडवल आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १२० हून अधिक गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. सत्ता असताना काहींना लोकांची आठवण आली नाही. आज मात्र आमच्यावर टीका करून स्वतःला झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघातही त्यांनी केला.

पर्यटन मंत्री म्हणून येराड, कोयना, पापर्डे परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून, पाटण तालुक्याचा चेहरामोहरा बदलत असल्याचं त्यांनी नमूद केलं. हा विकास कुणीही थांबवू शकत नाही, असा विश्वासही मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. ही लढाई खुर्चीसाठी नाही, तर पाटणच्या भविष्यासाठी आहे, असे सांगत त्यांनी भाषणाचा समारोप केला. या कार्यक्रमाला लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, तसेच शिवसेना व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोडोलीच्या सुपुत्राचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; उस्मानाबादी शेळी संवर्धनासाठी 'NBAGR' कडून पशुपालक रामचंद्र केशव जाधव यांचा विशेष सन्मान
पुढील बातमी
लातूर अर्बन को-ऑप. बँकेच्या कराड, सातारा शाखांचा आजपासून शुभारंभ

संबंधित बातम्या