सातारा : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत स्वच्छ माझे अंगण अभियान दि. 1 ते 20 जानेवारी अखेर संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात आहे.
अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून ओ. डी. एफ. प्लस मॉडेलचे सातत्य राखण्यासाठी वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करणे, घरगुती कचर्याचे वर्गीकरण व पुनर्वापर, कंपोस्ट खत तयार करणे. परसबाग निर्मिती करणे, सांडपाणी व्यवस्थापनासाठी शोषखड्डा व पाझर खड्ड्यांचा वापर करणे. त्यासोबत गावातील इतर कुटुंबांना प्रोत्साहित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे. अभियान कालावधीत स्वच्छतेचे आदर्श उदाहरण ठरलेल्या कुटुंबांना 26 जानेवारी रोजी ग्रामसभेमध्ये प्रशस्तीपत्रक, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात स्वच्छतेचा आदर्श निर्माण करुन इतरांना प्रेरित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने या अभियानात सहभागी व्हावे. घरातील कचरा व्यवस्थापन सांडपाणी व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करावे. यासाठी तालुका स्तरावरील गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी केले आहे.
या अभियानामध्ये कुटुंब निवडण्यासाठी घर परिसरात प्रत्येक कुटुंबाकडे घरगुती खतखड्डा किंवा परसबाग, वैयक्तिक शोषखड्डा किंवा पाझर खड्डा असणे आवश्यक आहे. स्वतःचे वैयक्तिक शौचालय व नियमित वापर आवश्यक आहे. कुटुंबस्तरावर ओला आणि चुका कचरा वर्गीकरणाची सुविधा असणे आवश्यक आहे. या निकषांच्या आधारे गावस्तरावर उत्कृष्ट कुटुंबांची निवड करुन त्यांना ग्रामसभेमध्ये सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांनी दिली.