सातारा : छत्रपती शंभुराजे यांची 365 वी जयंती 14 मे रोजी साजरी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पार्टी व प्रहार दिव्यांग क्रांती संस्था यांच्यावतीने सातार्यात गांधी मैदानावर रक्तदान आंदोलनाद्वारे शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न झाला. सध्याचे सरकार शेतकर्यांची कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या महत्त्वपूर्ण विषयावर मूग गळून बसले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या संदर्भात तोंड उचकटणार आहेत का, असा रोकडा सवाल प्रहार जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू पाटील यांनी सातार्यात केला.
रात्री नऊ वाजता येथील गांधी मैदानावर एका आगळावेगळ्या आंदोलनाची सुरुवात झाली. संघटनेच्या वतीने रक्त टंचाई भरून काढण्यासाठी सातार्यात संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केले. या संदर्भात रात्री नऊ वाजता बच्चू कडू यांनी सातार्यात येऊन थेट राज्य शासनाला प्रश्न विचारले.
ते म्हणाले, कर्नाटक सरकारचे बजेट तीन लाख कोटीचे आहे. तरी शेतकर्यांसाठी 45 हजार कोटीची तरतूद होते आणि महाराष्ट्राचे बजेट सात लाख कोटी असताना शेतकर्यांसाठी केवळ 9000 कोटींची तरतूद होते. दिव्यांग बांधवांसाठी मागच्या दोन वर्षात हजार कोटींची तरतूद असताना यंदा 400 कोटीची तरतूद करण्यात आली. नक्की हे सरकार काय करते आहे ? सातबारा कोरा करण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काहीच बोलत नाहीत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची दादागिरी संपली आहे काय ? दिव्यांग बांधवांचे अनुदान वेळेत जमा झाले नाही तर वित्त विभागाच्या सचिवांचे पगार करणार नाहीत, असे वचन मला दादांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात काहीच घडत नाही. प्रशासनावर वचक असणार्या दादांची दादागिरी गेली कुठे ? असाच सवाल त्यांनी केला.
धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या 365 व्या जयंतीनिमित्त राज्यात प्रहार संघटना सर्वत्र रक्तदान आंदोलनाची सुरुवात करत आहे. त्याची सुरुवात छत्रपतींच्या भूमीतून केली छत्रपतींच्या वंशाचे आमदार व सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वतः येऊन रक्तदान केले असते तर आम्हाला आश्वासक वाटले असते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यास येत्या दोन तारखेला वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्या घरासमोर आम्ही दहा हजार कार्यकर्ते शेतकरी जमवून बजेटच्या मांडणीची चिरफाड करणार आहोत, असे बच्चू कडू यांनी सांगितले.