दिल्ली : जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने अभिजीत दिपके यांच्यावर शाई फेकली, ज्यामुळे आंदोलनस्थळी एकच गोंधळ उडाला. मात्र तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी तत्परता दाखवत त्या महिलेला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. सध्या पोलीस या महिलेची कसून चौकशी करत आहेत.
आपल्यावर शाई फेकल्याच्या या घटनेनंतर अभिजीत दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एक पोस्ट शेअर केली आहे. "निळा माझा आवडता रंग आहे" असं म्हटलं. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन उपचारासाठी सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं आहे. यानंतर अभिजीत दिपके यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे.
मी आजपासून माझं आमरण उपोषण सुरू करत आहे
"मी आजपासून माझं आमरण उपोषण सुरू करत आहे. २० जुलै रोजी आमचा मोर्चा देखील निघेल आणि माझं उपोषणही सुरूच राहील. सोनम सरांना आत टाकून किंवा इथून हटवून हे आंदोलन संपवता येईल, असं या लोकांना वाटत आहे. पण हे आंदोलन संपणार नाही.”
आंदोलन संपणार नाही, २० जुलैला मोर्चा देखील निघेल
“सोनम सरांना फरफटत नेण्यात आलं आहे. शिवीगाळ करणं आणि त्यांना इथून घेऊन जाणं हे अत्यंत चुकीचं कृत्य आहे, याने आंदोलन संपणार नाही. हे आंदोलन सुरूच राहील. आम्ही इथेच थांबणार आहोत. आता २० तारखेला इथूनच संसदेपर्यंत मोर्चा काढण्यात येईल" असं अभिजीत दिपके यांनी म्हटलं आहे.