मृद नमुने तपासणी केंद्र सुरू करण्याकरीता मिळणार अनुदान

युवकांनी लाभ घेण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 05 August 2025


सातारा : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत मृद आरोग्य व सुपिकता कार्यक्रम सन २०२५-२६ अंतर्गत गाव पातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. सातारा जिल्हयात एकूण १५ मृद परीक्षण केंद्रांची उभारणी केली जाणार असून यासाठी १० वी उत्तीर्ण युवक, युवतींना संधी देण्यात येणार असून  प्रयोगशाळा उभारण्यासाठी प्रत्येकी १ लाख ५० हजार रूपयांचे अनुदान शासनाच्या वतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात शेतकरी जागरूक झाले असून मृद परिक्षण करून घेत आहेत आणि त्याचे सकारात्मक परिणामही दिसून आले आहेत. त्यामुळे मृद परिक्षणाची सोय शेतकऱ्यांना गावपातळीवर होण्याच्या दृष्टिने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतर्गत गावपातळीवर ग्रामस्तरीय मृद परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याची संधी शासनाने निर्माण केली आहे.

सातारा, कोरेगाव, पाटण व फलटण तालुक्यात प्रत्येकी २ प्रयोगशाळा व खटाव, कराड, वाई, खंडाळा, जावळी, महाबळेश्वर व माण या तालुक्यात प्रत्येकी १ याप्रमाणे प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रयोगशाळेची वार्षिक मृद नमुने तपासणी क्षमता ३००० मृद नमुने इतकी असणार आहे. त्यातील पहिल्या ३०० नमुन्यांची तपासणी दर नमुन्यांवर ३०० रू शासनाकडून दिले जातील. तसेच त्यापुढील ५०० मृद नमुने तपासणीवर २० रु प्रति मृद नमुन्याप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. उर्वरीत २२०० नमुन्यांची तपासणी संबंधित प्रयोगशाळा स्वतःच्या खर्चावर शासन दरानुसार शेतकऱ्यांकडून शुल्क आकारून करू शकेल. मृद नमुने तपासणी शासन दर ३०० रू असून त्यामध्ये मृद नमुने गोळा करणे, तपासणी करणे व जमिन आरोग्यपञिका तयार करून शेतकऱ्यांना देणे या बाबीचा समावेश राहिल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अपघातात महिलेस जखमी केल्याप्रकरणी अज्ञात टेंम्पो ट्रॅव्हलर चालकावर गुन्हा
पुढील बातमी
पोषण आहार तपासणीसाठी 11 भरारी पथके

संबंधित बातम्या