अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत

मकरंद पाटील; जिल्हाधिकाऱ्यांनी शेती नुकसानीवर विशेष लक्ष द्यावे

by Team Satara Today | published on : 19 August 2025


सातारा  : राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे. 

मंत्री पाटील यांनी सांगितले, की भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सतर्क राहावे. शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा, यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी, पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत. या नुकसानीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तांमार्फत शासनास सादर करावा. 

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, घरे पूर्णपणे बाधित किंवा अंशतः बाधित झाल्यास त्याचेही तातडीने पंचनामे करून त्यांना मदत देण्यात यावी, तसेच टपरीधारक, छोटे व्यावसायिक यांचे नुकसान झाल्यास अशा बाधितांचे तातडीने पंचनामे करून या बाधितांना जलद मदत देण्यात यावी. ही मदत त्यांना तातडीने मिळावी, यासाठीही शासनाने उणे प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्यास शासनाने यापूर्वीच परवानगी दिली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या बाधितांना तत्काळ मदत मिळावी, त्यांना दिलासा देण्याचे प्रशासनाने काम करावे, तसेच या बाधितांना शासन निकषानुसार मदत करावी, असे निर्देशही मंत्री मकरंद पाटील यांनी दिले आहेत. 

नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत मिळावी, तसेच जखमी नागरिकांना मदत मिळावी, यासाठी शासनाने उणे (-) प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी सूचनाही मंत्री मकरंद पाटील यांनी दिली आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयनेचे सहा दरवाजे ५ फुटांनी उघडले
पुढील बातमी
युनेस्को टीमकडून ‘कास’वर वनस्पतींचा अभ्यास

संबंधित बातम्या