सातारा : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना, सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक ३ब (सर्वसाधारण महिला) या जागेसाठी आरक्षित असतानाही एका पुरुषाने नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. विशेष म्हणजे, छाननी प्रक्रियेतही हा अर्ज वैध ठरल्याने आश्चर्य व्यक्त झाले मात्र पालिका प्रशासनाने चूक तातडीने दुरुस्त करून वैध यादी प्रसिद्ध केली.
नेमका प्रकार काय घडला?
राखीव जागा: सातारा नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये ३ब ही जागा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.
उमेदवारी अर्ज: या जागेसाठी एकूण सात (७) उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
पुरुष उमेदवाराचा अर्ज: या सात अर्जांपैकी सहा अर्ज महिलांचे असताना, एका पुरुषाचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
भाजपचा आक्षेप: भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी शहराध्यक्ष विकास गोसावी व नगरपालिका प्रभारी यांनी ही बाब निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेवर आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पुरुषाचा अर्ज दाखल होत असताना, निवडणूक निर्णय अधिकारी नेमके करत होते काय? अर्ज दाखल करतानाच ही चूक का सुधारली गेली नाही . अशा प्रश्नांकडे लक्ष वेधल्यावर मात्र या यादीची दुरुस्ती प्रांत आशिष बारकुल यांच्या उपस्थितीत करून त्रुटी दूर करण्यात आल्या.