सातारा : सातारा नगरपालिकेच्या निकाल प्रक्रियेला २४ तास उलटून गेले असताना येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करण्यात न आल्यामुळे त्याचा विनाकारण वाहन चालकांना फटका बसत आहे त्यामुळे तेथील वाहतूक पूर्ववत करण्यात यावी, अशी मागणी त्रस्त वाहन चालकांमधून होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. या परिसरात पेट्रोल पंप, हॉटेल्स, धाबे, किराणा मालाची दुकाने, बस थांबा, मेडिकल, विविध गॅरेज, शोरूम, विविध बँका, एटीएम मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हा परिसर नेहमीच गर्दीने गजबजून जातो. विशेष करून सायंकाळी पाचनंतर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळते. दि. २१ डिसेंबर रोजी सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली कोरेगाव बातमी साताराकडे येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. तेथूनच काही अंतरावर उड्डाणपूला खालून ती पुन्हा साताऱ्याकडे वळवण्यात आली. निकाल प्रक्रिया होऊन २४ तास उलटली असली तरी अद्यापही वाहतूक व्यवस्था पूर्ववत न केल्यामुळे त्याचा वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे उड्डाणपुलाखालील वाहतूक व्यवस्था पूर्ववत करून वाहन चालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्रस्त वाहन चालकांमधून होत आहे.