सातारा : कराड तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या टोळीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दणका दिला. तिघांच्या टोळीला सातारा व सांगली जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
रितेश सर्जेराव घारे (वय 22, रा. घारेवाडी ता. कराड), शिवराज महादेव कुंभार (वय 29, रा. शुक्रवारपेठ, कराड), संग्राम अशोक पवार (वय 23, रा. आगाशिवनगर, मलकापुर ता. कराड) अशी तडीपार केलेल्या टोळीची नावे आहेत. यातील रितेश घारे हा टोळीप्रमुख आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, या संशयित टोळीवर दरोडा, खुनाचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवुन दंगा मारामारी करुन दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करणे यांसारखे गंभीर गुन्हे कराड तालुका व कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. संशयित टोळीवर गुन्हे दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना वेळोवेळी अटक केली. तसेच प्रतिबंधक कारवाई देखील केली. मात्र संशयितांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट गुन्हेगारी कारवाई सुरुच ठेवल्या. या टोळीवर कायदयाचा कोणताच धाक न राहिल्यामुळे कराड तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर उपद्रव होत होता. यामुळे या टोळीवर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती.
कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोनि महेंद्र जगताप यांनी या टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे संपूर्ण सातारा व सांगली जिल्हयातुन दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला. या प्रस्तावाची चौकशी डीवायएसपी अमोल ठाकूर यांनी केली होती. हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी या टोळीला संपूर्ण सातारा व सांगली जिल्हा हद्दीतून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारित केला.