सातारा : मिरची खरेदीसाठी लाखो रुपयांची आगाऊ रक्कम घेऊनही माल न पाठवता बनावट जीएसटी बिल दिल्याचा आरोप करत 19 लाख 93 हजार 732 रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी कर्नाटकातील व्यापार्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतापगंज पेठेतील मसाले व्यापारी संतोष सुरेशलाल सारडा (वय 47) यांनी फिर्याद दिली. नोव्हेंबर 2025 पासून 26 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत हा व्यवहार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादीनुसार, ब्याडगी येथील ‘ए. के. कुंडगोल’ दुकानाचे मालक शोएब कुंडगोल यांच्याकडून 400 पोती बेडगी, काश्मिरी बेडगी आणि संकेश्वरी मिरची मागविण्यात आली होती. त्यासाठी 1 डिसेंबर 2025 रोजी 5 लाख, 14 डिसेंबर रोजी 9 लाख आणि 19 डिसेंबर रोजी 5 लाख 53 हजार 732 रुपये, अशी एकूण 19 लाख 53 हजार 732 रुपये रक्कम आरटीजीएसद्वारे पाठविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
रक्कम मिळूनही माल पाठविण्यात आला नाही. उलट माल खरेदी करून तो कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्याचे बिल व्हॉट्सऍपवर पाठविण्यात आले. मात्र, जीएसटी पोर्टलवर तपासणी केली असता या बिलाची नोंद आढळली नाही. त्यामुळे बनावट बिलाच्या आधारे आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी शोएब कुंडगोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.