अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणीचा गुन्हा

गायकवाड मूळचे फलटण तालुक्यातील ; त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे वाखरी गावात खळबळ

by Team Satara Today | published on : 14 April 2026


सातारा/अकोला: अकोल्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाखरी गावचे रहिवासी असल्याने या कारवाईचे पडसाद त्यांच्या गावीही उमटले आहेत. शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवले असून, आता त्यांच्या निलंबनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

​या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, गेल्या काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यातील स्टोन क्रशर व्यावसायिक आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यात रॉयल्टीच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता. स्टोन क्रशर उद्योजक विवेक प्रभाकर बिजवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १९ मार्च २०२६ रोजी बार्शी टाकळी परिसरातील एमआयडीसी भागात गायकवाड यांनी बिजवे यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. तसेच इतर सदस्यांकडूनही अशाच प्रकारे रक्कमेची मागणी करून, पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली. या धमकीला घाबरून तक्रारदाराने गायकवाड यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन त्यांना १५ हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर १ एप्रिल रोजी पुन्हा फोन करून गायकवाड यांनी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

​या तक्रारीनंतर पोलिसांनी नऊ दिवस सखोल चौकशी केली. पुरावा म्हणून पोलिसांकडे एक ऑडिओ क्लिप (ध्वनीफित) सादर करण्यात आली होती. या चौकशीअंती पोलिसांनी गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा रजि. नं. २७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०८ (२), ३५१ (१) आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, प्रमोद गायकवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आपण केवळ शासनाचे स्वामित्वधन (रॉयल्टी) वसूल करण्यासाठी व्यवसायिकांवर दबाव टाकला होता, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

​प्रमोद गायकवाड हे वाखरी (ता. फलटण) येथील पहिले उपजिल्हाधिकारी ठरले होते. स्पर्धा परीक्षेत यश मिळवून गावाचा लौकिक वाढवणाऱ्या अधिकाऱ्यावर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने वाखरी परिसरात आश्चर्य आणि हळहळ व्यक्त होत आहे. अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला असून, राज्य सरकारकडून त्यांच्यावर आगामी काळात कोणती प्रशासकीय कारवाई केली जाते, याकडे प्रशासकीय वर्तुळाचे डोळे लागले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
इराणसोबतची चर्चा निष्फळ; ट्रम्प यांचा पंतप्रधान मोदींना फोन, ४० मिनिटे खलबते
पुढील बातमी
‘यहा के हम सिकंदर’ कुळकजाईचे मैदान शेखने मारले; पंजाब केसरी अमित कुमारवर ‘एकचाक’ डावाने मात

संबंधित बातम्या