संदीप साळुंखे यांच्या कुणबी प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करा - नंदकुमार माने यांची मागणी; बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप

by Team Satara Today | published on : 30 June 2026


सातारा : जिल्हा परिषदेच्या निमसोड गटाचे सदस्य संदीप साळुंखे यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविण्यासाठी कथितरीत्या खोट्या कागदपत्रांच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करत त्याची सखोल चौकशी करून संबंधित प्रमाणपत्र रद्द करावे, तसेच दोषी आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा भाजपचे खटाव तालुका नेते नंदकुमार मोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

मोरे यांनी सांगितले की, साळुंखे यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या वंशावळीत चुकीचे नातेसंबंध दाखविण्यात आले आहेत. संबंधित महिलेला वडिलांची आत्या म्हणून नमूद करण्यात आले असले, तरी उपलब्ध वंशावळीनुसार ती त्यांच्या कुटुंबाशी संबंधित नसल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सरकारी अभिलेखांमध्ये कथितरित्या खाडाखोड करून प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

या संदर्भात सातारा जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरण अंतिम सुनावणीच्या टप्प्यात असल्याचे मोरे यांनी सांगितले. हा विषय राजकीय नसून सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याचा गंभीर मुद्दा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजातील हजारो युवक कायदेशीर मार्गाने कुणबी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रयत्नशील असताना अशा कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण प्रक्रियेबाबत संशयाचे वातावरण निर्माण होत असून पात्र उमेदवारांनाही अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

साळुंखे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सखोल चौकशी करून संबंधित कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे, चुकीच्या माहितीच्या आधारे मिळविलेल्या लोकप्रतिनिधी पदाबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी आणि दोषी आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मोरे यांनी केली. या प्रकरणी न्याय मिळविण्यासाठी कायदेशीर लढा अखेरपर्यंत सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवडमधील वडार समाजावरील कारवाई विरोधात संताप; झोपड्या हटविल्याचा आरोप; जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायासाठी धाव
पुढील बातमी
लिंब येथे जुगारप्रकरणी एकावर कारवाई; 3840 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत

संबंधित बातम्या