वाढे फाटा ते वाठार स्टे. मार्गावरील अवजड वाहतूक तातडीने बंद करा; संभाजी ब्रिगेडची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

by Team Satara Today | published on : 19 August 2026


​सातारा : सातारा (वाढे फाटा) ते वाठार स्टे. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक तातडीने बंद करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय कार्याध्यक्ष ॲड. गणेश चोरगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

​वाढे फाटा–वाठार स्टे.–लोणंद–शिरवळ या राज्यमार्गाचे रुंदीकरण व विकासकाम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. कामातील नियोजनाच्या अभावामुळे संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. वाढे फाटा येथील नदीच्या पुलावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून तळ्याचे स्वरूप येत असून, अनेक ठिकाणी पुलांच्या अपूर्ण कामांमुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

​या मार्गालगत अनेक गावे आणि वाड्या-वस्त्या असून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार व रुग्णांना सातारा शहरात ये-जा करण्यासाठी हाच मुख्य रस्ता आहे. रस्त्याची झालेली दुरवस्था आणि त्यातच सुरू असणारी अवजड वाहनांची बेसुमार वाहतूक यामुळे हा मार्ग अपघातप्रवण बनला असून रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत.

​हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित होईपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी तसेच संबंधित ठेकेदाराला कडक सूचना देऊन रस्त्याचे काम युद्धपातळीवर व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून घ्यावे, अशी मागणी निवेदनात नमूद आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रशासनाने ठोस पावले न उचलल्यास ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संभाजी ब्रिगेडने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वाद्यांच्या गजरात आणि शिव्यांच्या लाखोलीत रंगला पारंपरिक ‘बोरीचा बार’
पुढील बातमी
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतिम मतदार यादी कार्यक्रम जाहीर; आक्षेप घेण्यासाठी २७ ऑगस्टपर्यंत मुदत

संबंधित बातम्या