वडीगोद्री : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी सरकारवर जोरदार टीका करत, ‘आम्ही सांगितलेल्या सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करू नका,’ असा इशारा दिला. रद्द केलेली चार प्रमाणपत्रे वैध करावीत, ५८ लाख नोंदींच्या आधारे आजपासून जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करावे, तसेच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.
जरांगे म्हणाले, सध्या ‘उंटावरून शेळ्या हाकण्याचे’ काम सुरू आहे. सरकारने आंदोलनस्थळी येऊन केवळ चर्चा करण्यापेक्षा मागण्यांबाबत ठोस निर्णय घ्यावा. सातारा आणि कोल्हापूर संस्थानसंदर्भातील जीआर काढावेत. ईसीबीसीच्या माध्यमातून नियुक्त्या झालेल्या मुलांना नियुक्त्या द्याव्यात. सारथी आणि महामंडळाचे परतावे द्यावेत, अशीही मागणी त्यांनी केली.
‘माणसाची तब्येत बिघडण्याची वाट पाहता का?’
सरकारकडून मसुदा वाचला का आणि तो मान्य आहे का, असा प्रश्न वारंवार विचारला जात असल्याबद्दल जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. ‘माझी तब्येत आणखी खराब होण्याची वाट पाहता का? माणूस बेशुद्ध पडल्यानंतर येऊन मसुदा वाचला का, असे विचारणार का?’ असा सवाल त्यांनी केला. मराठा समाजाला सरकार फसवणार असल्याचा आरोप करत, मराठ्यांसह ओबीसी समाजालाही फसवले जात असल्याचे जरांगे म्हणाले. सर्व जातींनी एकत्र येऊन सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
‘चुकीचा जीआर काढा; गरज पडल्यास सुधारित जीआर काढा’
‘तुम्हाला जीआर काढायचे असतील तर काढा. त्यात काही चूक झाली तर सुधारित जीआर काढा. गावोगावी कॅम्प लावा आणि जात प्रमाणपत्रांचे वाटप सुरू करा,’ अशी भूमिका जरांगे यांनी मांडली. सातारा आणि कोल्हापूर संस्थानचा मसुदा अद्याप देण्यात आलेला नसल्याचा आरोप करत, चार प्रमाणपत्रांचा मुद्दा आधी मार्गी लावण्याची मागणी त्यांनी केली.
शिंदेंच्या राजकारणावर भाष्य टाळले
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत विचारले असता, त्यांच्या राजकारणाशी आपल्याला काहीही देणेघेणे नसल्याचे जरांगे यांनी सांगितले. सरकारने मागण्यांवर निर्णय घेणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विखे, सामंत यांच्यावरही टीका
महसूलमंत्री किंवा सरकारमधील नेत्यांकडून ‘चांगला प्रतिसाद’ मिळत असल्याच्या दाव्यांवरही जरांगे यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘चांगला प्रतिसाद म्हणजे काय? मराठ्यांचा अवमान होणार असेल तर जाऊ द्या. सरकारला यायचे असेल तर सगळे जीआर घेऊन या; अन्यथा येऊ नका,’ असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘त्यांनी आमचे वाटोळे केले; तुम्ही काय कमी केले का? आता तुम्ही शिफारस करा, कुणाकडे बोट दाखवू नका,’ असे जरांगे म्हणाले.
सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा, उपोषण सोडणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करण्याची मागणी
by Team Satara Today | published on : 02 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा