रक्षक प्रतिष्ठानचा उपक्रम वाखाणण्याजोगा : खा. उदयनराजे भोसले

मित्र परिवाराचा लोक संग्रह हीच माझी खरी श्रीमंती असल्याचा दिला निर्वाळा

by Team Satara Today | published on : 17 July 2025


सातारा : राजघराण्याचे राजे राजवाडे ही माझी श्रीमंती नाही, तर माझ्या समाजकारणात आणि राजकारणात मला तीन दशकांपेक्षा अधिक काळ साथ देणारे माझे सहकारी हीच माझी खरी श्रीमंती आहे. हा लोक संग्रह मला समृद्ध बनवतो, अशी प्रामाणिक प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली

रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील गरजूंना छत्री यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उदयनराजे भोसले यांनी तोंडभरून कौतुक केले. यावेळी लोकसभा संयोजक सुनील काटकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशीलदादा मोझर, पंकज चव्हाण, महेश गुरव तसेच रक्षक प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी रक्षक प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकार्‍यांना खा. उदयनराजे यांनी शुभेच्छा दिल्या.

रक्षक प्रतिष्ठानने ऐन पावसाळ्यामध्ये सातारा शहरातील गरजूंना छत्री देण्याचा उपक्रम आखून आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. या उपक्रमाची सुरुवात खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आली रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सुशीलदादा मोझर यांनी खासदार उदयनराजे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. रक्षक प्रतिष्ठानचा लोगो असलेल्या छत्र्यांचे अनावरण यावेळी उदयनराजे भोसले यांनी केले.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदयनराजे भोसले म्हणाले, माझ्या गेल्या तीन दशकातल्या समाजकारणामध्ये अनेक मित्रांनी मला साथ दिली. रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशीलदादा मोझर यांनी सातार्‍यातील गरजू लोकांसाठी छत्री वाटपाचा घेतलेला उपक्रम हा कौतुकास्पद आहे. समाजातील ज्या लोकांना पोटाची खळगी भरण्यासाठी खूप कष्टावे लागते, अशा लोकांची गरज ओळखून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला आणि सिद्धीला नेला. याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. रक्षक प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीला तोड नाही. माझ्या मित्रांसाठी आणि त्यांच्या कोणत्याही उपक्रमाला मी सहकार्य करायला कधीही कमी पडणार नाही. मित्र परिवाराचा हा लोक संग्रह हीच माझी खरी श्रीमंती असल्याचे प्रामाणिक मत उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केले. रक्षक प्रतिष्ठानच्या नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्य शासनाचे मेक इन महाराष्ट्र नॅचरल फ्लॉवर्स धोरण
पुढील बातमी
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे शनिवारी सातारा जिल्ह्यात होणार जंगी स्वागत

संबंधित बातम्या