रहिमतपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी वेळू (ता. कोरेगाव) येथील प्रसिद्ध कवी विक्रम मालन आप्पासो शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी ही माहिती दिली.
यावेळी डॉ. गोरे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात योगदान देणार्या लेखक व कवींना महत्त्वाच्या जबाबदार्या मिळाव्यात, तसेच युवा लेखकांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगितले. कार्यक्रमास परिषदेच्या उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर, महाराष्ट्र प्रदेश संघटक अमोल कुंभार, पुणे जिल्हाध्यक्ष रमेश रेडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवा प्रदेशाध्यक्ष ड. सुमेध गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले.
विक्रम शिंदे यांनी आपल्या कवितांमधून कामगार व सामाजिक प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली आहे. श्वास ओला, अस्वस्थ, ज्ञानज्योत आणि अक्षरदीप हे त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह आहेत. साहित्य संमेलनांच्या आयोजनातून कष्टकरी लेखकांचे साहित्य मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभर 40 हून अधिक प्रकाशन व साहित्य संस्था सुरू झाल्या असून अनेक युवा कवी, लेखक व प्रकाशक घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. साहित्य चळवळीतील सर्वसमावेशक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.