सातारा : महाराष्ट्राची लोकपरंपरा, संस्कृती आणि कलांचा उत्सव साजरा करण्यासाठी साताऱ्यात छत्रपतींच्या राजधानीत “फोक प्रबोधन” हा भव्य कार्यक्रम होत आहे. हा विशेष सांस्कृतिक सोहळा गुरुवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शाहू महाराज कला मंदिर, सातारा येथे रंगणार आहे. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळू लागला आहे.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विविध पारंपरिक ग्रामीण लोकनृत्य, लोकगीत, पोवाडा, जलसा, नाट्यप्रयोग, आणि लोकसंगीत यांचा अप्रतिम संगम अनुभवायला मिळणार आहे. सुमारे ४० पेक्षा जास्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करणाऱ्या कलाकारांचा कलाविष्कार पाहण्यास मिळणार आहे.
महाराष्ट्राची लोक संस्कृती, लोकजीवन आणि परंपरांचा जिवंत आविष्कार एकाच प्रयोगातून साकारला जाण्याची ही साताऱ्यामध्ये पहिलीच वेळ आहे.
“फोक प्रबोधन” हे फक्त मनोरंजनाचे माध्यम नसून, ग्रामीण कलावंतांना कलापीठ मिळवून देणारे आणि नव्या पिढीसमोर महाराष्ट्राच्या लोककलेचा वारसा जपणारे एक सांस्कृतिक अभियान आहे. या अभियानातून परंपरा जतन करताना नवीन पिढीलाही कलेची माहिती मिळणार आहे. कार्यक्रमात पारंपरिक वाद्य, लावणी, गोंधळ, पोवाडे, पिंगळा, वासुदेव, भारुड, गोंधळ आणि इतर पारंपरिक कलारूपे यांचा समावेश आहे .प्रेक्षकांसाठी ही एक अनोखी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
फोक प्रबोधन चे ऑनलाईन तिकीट BookMyShow वर उपलब्ध असून, साताऱ्यातील कला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लोककलेच्या या पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.