वीज कुणाला माफ करत नाही, विद्युत सुरक्षा हाच उपाय

मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांचे प्रतिपादन

by Team Satara Today | published on : 07 June 2025


बारामती : विजेची कामे करताना अनेक वीज कर्मचाऱ्यांचे, ग्राहकांचे प्राण आजवर धोक्यात आले आहेत. वीज कुणालाही माफ करत नाही, त्यामुळे विजेची कामे करताना सुरक्षा साधनांचा वापर करा, घराची अर्थिंग, सर्किट ब्रेकर सुस्थितीत ठेवा असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.

महावितरणच्या २० वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि.६) बारामती येथील कविवर्य मोरोपंत नाट्यगृहात वीज कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘वीज कर्मचाऱ्यांनी कामे करताना आपण घरातील कर्ते आहोत, आपल्यानंतर कुटुंबाचे काय होईल याची कल्पना करुन विद्युत सुरक्षा साधनांचा वापर करावा.’ व्यासपीठावर बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, अधीक्षक अभियंते दिपक लहामगे, अनिल गेडाम व बाळासाहेब हळनोर, सहा. महाव्यवस्थापक सौ. कीर्ती भोसले, धैर्यशील गायकवाड यांचेसह बारामती मंडलातील कार्यकारी अभियंते यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड म्हणाले, ‘लहानपणी आम्ही वीजबिल भरण्यासाठी रांगेत वेळ घालवायचो. पण आता ऑनलाईनमुळे वीजबिल भरणे एका क्षणाचे काम झाले आहे. खाजगीकरणाच्या युगातही महावितरण तोडीस तोड कामगिरी करत आहे. पोलिसांपेक्षाही वीज कर्मचाऱ्यांचे काम जोखमीचे आहे.’

कार्यक्रमाच्या सुरुवातील शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना, शहीद जवानांना व वर्षभरात विजेची कामे करताना मृत्यू झालेल्या वीज कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्मचारी पाल्यांचे कलागुणांना व्यासपीठ मिळवून देत चिमुकल्यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचा केक कापण्यात आला. प्रास्ताविक अधीक्षक अभियंता दिपक लहामगे यांनी तर सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता सुशांत कांबळे, मृदुला शिवदे व सहा. अभियंता रोहित राख यांनी केले.

मुख्यमंत्री व मान्यवरांचे चित्रफितीद्वारे सुरक्षा संदेश

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री  ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी चित्रफितीद्वारे महावितरणला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राज्यातील ऊर्जा विभागाच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकला. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी देखील वीज कर्मचाऱ्यांना चित्रफितीद्वारे वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या व वीज सुरक्षेविषयी आवाहन केले.

राज्यभरात एकाच वेळी विद्युत सुरक्षेची प्रतिज्ञा

२० व्या वर्धापनदिनी राज्यात एकाच वेळी सकाळी १० ते १०.१५ यावेळेत सर्व वीज कर्मचारी, अधिकाऱ्यांनी विद्युत सुरक्षेची सामुहिक प्रतिज्ञा घेतली. बारामती येथील सामुहिक प्रतिज्ञा कार्यक्रमाला बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल बागल, मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दिपक लहामगे व अनिल गेडाम यांचेसह महावितरणचे सर्व वरिष्ठ अभियंते, अधिकारी व वीज कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्युत सुरक्षा सप्ताहाची सांगता

१ ते ६ जून दरम्यान महावितरणकडून विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले होते. मॅरेथॉन, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, SMS, email आदींच्या माध्यमातून विद्युत सुरक्षेविषयी चौफेर जनजागृती करण्यात आली. ऑनलाईन प्लॅटफार्मच्या माध्यमातून वीज कर्मचारी व ग्राहकांसाठी प्रश्नमंजुषा घेण्यात आली. तसेच त्यांना ऑनलाईन प्रमाणपत्र देऊन गौरवही करण्यात आला. ग्राहक, कर्मचारी, विद्यार्थी सर्वांनाच या सप्ताहात सामावून घेण्यात आले होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शस्त्राचा धाक दाखवून दाम्पत्याला लुटले
पुढील बातमी
रक्षा नदीत, पाण्यात विसर्जित न करता वृक्षलागवड

संबंधित बातम्या