गुरुकुल स्कूलच्या कॅडेट्सचे एनसीसी 'ए' सर्टिफिकेट परीक्षेमध्ये उज्ज्वल यश

by Team Satara Today | published on : 29 April 2025


सातारा : गोडोली, शाहूनगर येथील गुरूकुल एज्युकेशन सोसायटीच्या इंग्रजी माध्यम गुरूकुल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच सांस्कृतिक, सामाजिक, कला, क्रीडा, विज्ञान, खेळ, राष्ट्रप्रेम यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येतात.

22 महाराष्ट्र बटालियन सातारा, हेड ऑफिस कोल्हापूर यांच्या माध्यमाने दिनांक 2 फेब्रुवारी रोजी एनसीसी ए सर्टिफिकेट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी गुरुकुल सेकंडरी स्कूलचे 41 कॅडेट्स बसले होते. यातील 40 कॅडेट्स 'अ' श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या यशाबद्दल गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांनी कॅडेट्सचे अभिनंदन केले. यावेळी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे उपस्थित होते. 22 महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर एम. ए. राजमन्नार (सेवा मेडल), सुभेदार मेजर संभाजी भिसे यांनी ट्रूपचे विशेष कौतुक केले.

यावेळी राजेंद्र चोरगे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी राष्ट्रप्रेम व स्वयंशिस्त निर्माण होण्यासाठी चार वर्षापूर्वी शाळेमध्ये एनसीसी विभाग सुरु करण्यात आला. एनसीसीमुळे गुरुकुलचे कॅडेट्स भविष्यात राष्ट्राच्या सेवेत दिसतील, असा विश्वास आम्हा सर्वांना वाटतो. या कॅडेट्सचे यश त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

सचिव आनंद गुरव, अर्जुन चोरगे, अ‍ॅड. ऐश्वर्या चोरगे, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल, राजेंद्र खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक, पालक, सदस्य यावेळी उपस्थित होते. एनसीसी ANO सौ. मेघा तपासे, एनसीसी प्रशिक्षक दत्तात्रेय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली कॅडेट्सनी हे घवघवीत यश संपादन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पर्यटन महोत्सवा दिवशीच वेण्णा तलावात स्टॉलधारकांसह जलसमाधी घेणार
पुढील बातमी
सातारा स्थानिक गुन्हे शाखेसह उत्पादन शुल्क ची धडाकेबाज संयुक्त कारवाई

संबंधित बातम्या