सातारा : मराठा आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख यांचा सध्या मनमानी कारभार सुरू आहे. कर्ज प्रस्तावाचे एल वाय प्रमाणपत्र नाकारण्याचे उद्योग सुरू असून त्या माध्यमातून महामंडळाला लाभार्थी कमी करणे आणि महामंडळ अडचणीत आणण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे चेअरमन नरेंद्र पाटील यांनी केला.
राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी व्यवस्थापकीय संचालक यांना महामंडळ अडचणीत आणण्याची सुपारी दिल्याची गंभीर टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली .अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्या समिती सदस्यांच्या बैठकीत कोणतेही धोरणात्मक निर्णयाची चर्चा होऊन त्याला बैठकीत मान्यता दिली जाते .व्यवस्थापकीय संचालकांनी संगणक अद्ययावतीकरण याच्या नावाखाली नवीन उद्योजकांच्या कर्जाची एलवाय प्रस्ताव नाकारण्याचे काम सुरू केले आहे .यामध्ये समितीच्या कोणत्याही परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत .व्यवस्थापकीय संचालक सध्या स्वतःच्या स्वाक्षरीने महामंडळाचे प्रशासन चालवत आहेत उपसमितीचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यवस्थापकीय संचालकांना एका बैठकीत याबाबतच्या कटाक्षाने सूचना देऊनही त्यांच्या वागण्यात फरक पडलेला नाही .
येत्या सोमवारी मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना भेटून या गंभीर प्रकाराची माहिती देणार आहे .मराठा समाजाची नवोद्योजक त्यांना मिळणारे कर्ज त्यावरील व्याज महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येईल असे फडणवीस यांनी सांगितले आहे प्रत्यक्षात मात्र कर्जाचे प्रस्ताव आणि त्याचे एलवाय प्रमाणपत्र कसे रद्द करायचे याचा दुसरीकडे घाट घातला जात आहे .राज्याच्या धाराशिव मराठवाडा नागपूर विभागातून अनेक प्रस्ताव एलवाय प्रमाणपत्र दाखवून रद्द करण्यात आली आहेत .त्यामुळे व्यवस्थापकीय संचालकांच्या मनमाणीपणाला मराठा उद्योजक वैतागले आहेत .या महामंडळाच्या माध्यमातून मी माझा मतदारसंघ कोठेही बांधलेला नाही उलट मराठा उद्योजक महाराष्ट्रात घडवण्याची काम गेल्या सहा वर्षापासून मी प्रामाणिकपणे करत आहे. महामंडळ आर्थिक दृष्ट्या अडचणीत आणण्याचे षडयंत्र आणि त्याची सुपारी छगन भुजबळ यांनी विजयसिंह देशमुख यांना दिली आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा मराठा समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या सारथी महामंडळाच्या अनेक योजना कमी केले आहेत ते सुद्धा बहुतेक या षडयंत्र सामील आहे असा धक्कादायक आरोप त्यांनी केला.