येळगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. ऍड उदयसिंह पाटील - उंडाळकर, अजितराव पाटील - चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रवक्ते पैलवान तानाजी चवरे, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती फरिदा इनामदार, किसनराव जाधव, सरपंच अनुराधा माने, यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुती व गद्दारांचा दणदणीत पराभव केला. 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने जातीयवादी पक्षाला कधीही स्थान दिलेले नाही. ती परंपरा जपा.
कराडच्या जनतेने मला आशीर्वाद दिल्यामुळे मी पहिल्यांदा खासदार झालो. त्यावेळेस मी चांगले काम केले म्हणून मला सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. तेथेही मी चांगले काम केले. आणि मला पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी महाराष्ट्राच्या भल्याकरीता अनेक निर्णय घेतले. व कराड दक्षिणमध्ये 1800 कोटीची कामे केली.
पुढे आ. चव्हाण म्हणाले, त्यानंतरही मतदारसंघात भरीव कामे केली. पण निवडणुकीच्या तोंडावर कराड दक्षिणमधील काहींनी विकासाची केवळ बॅनरबाजी केली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपचे सरकार असताना ते कुठे होते. हे समजायला लोकं दूधखुळी नाहीत.
ऍड उदयसिंह पाटील - उंडाळकर म्हणाले, विरोधकांनी लोकांच्या जीवावर व्यक्तिगत स्वार्थासाठी संस्था उभा केल्या. त्या संस्था कॉंग्रेसच्या देण आहेत. व त्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशातून तयार झाल्या आहेत. कराड दक्षिणमध्ये स्थापनेपासून तयार झालेली विचारसरणी जोपासणे महत्वाचे आहे.
ते म्हणाले, रयत सहकारी साखर कारखाना उसाला 3150 रुपये दर देवू शकतो. मग 50 वर्षांपासून सुरू असलेले कारखाने 3100 दर देतात, हे कशाचे द्योतक आहे. सामान्य माणसाच्या हातात अर्थकारण जाता कामा नये, ही त्यांची विचारसरणी आहे. हे यातून स्पष्ट होते.
प्रा. धनाजी काटकर, शेवाळे गुरुजी, संतोष थोरवडे यांची भाषणे झाली. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी चवरे यांनी आभार मानले.
अतुल भोसलेंना फक्त कारखान्यातील ऊस तोडणीचे करार माहिती प्रचार सभेत बोलताना अजितराव पाटील-चिखलीकर म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वसामान्य जनतेने मोठे केलेले नेतृत्व आहे. त्यांचे विचार राष्ट्रीय विचारधारा व विकास जपणारे आहेत. त्यांनी केंद्रात मंत्री असताना अणुकरार केला. अतुल भोसलेंना फक्त कारखान्यातील ऊस तोडणीचे करार माहिती आहेत. यशवंतराव मोहिते नसते, तर कृष्णा कारखाना उभा राहिला नसता. असे सांगताच एकच हशा पिकला.