पुणे : राज्यात उघडीप दिलेला पाऊस आता परतीच्या मार्गावर आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यातच मुंबईसह ठाण्याचा पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर कोकणातील रायगड आणि पुण्याला पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय, हवामान विभागाने नाशिक, नगर, पुणे, पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, सांगली, सोलापूर यांसह इतर काही जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
कोकण, मराठवाडासह विदर्भात मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मंगळवारपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात ठिकठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 26 सप्टेंबरपर्यंत मुंबईसह ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परतीच्या पावसानं पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. मंगळवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. त्यानंतर संध्याकाळीही संततधार सुरूच होती.
राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होत आहे. त्यात सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील तासगाव, पलूस तालुक्यासह खानापूर माथ्यावर अनेक भागात सलग पाऊस झाला आहे. सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीही दुथडी भरून वाहू लागली. या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये पाणी साचून राहू लागले.
पुण्यातही मुसळधार पाऊस झाला. यात रात्री साडेआठपर्यंत 19.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. लोहगाव, येरवडा, हडपसर भागांत जास्त पाऊस पडला. दिवसभरात कमाल 31.1 आणि किमान 22.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढील दोन दिवस पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.