मुंबई : नियमित प्रवासी भाडेवाढीनंतर आता लग्नसमारंभ, पर्यटन, धार्मिक यात्रा व खासगी कार्यक्रमांसाठी आरक्षित केल्या जाणाऱ्या एसटी बससेवेचे दर वाढले आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आकस्मिक करारासाठी सुधारित दरपत्रक लागू केले असून, साध्या बसच्या प्रवासाचे भाडे प्रति किमी ५५ वरून ७५ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे प्रति किलोमीटर २० रुपयांची वाढ झाली आहे.
सुधारित दरपत्रकानुसार किमान भाडे, बस आरक्षण रद्द केल्यास आकारण्यात येणारे शुल्क, अतिरिक्त वेळेचे शुल्क तसेच अनामत रकमेच्या संबंधित नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. मात्र, शैक्षणिक सहलींसाठी देण्यात येणारी ५० टक्के सवलत कायम ठेवण्यात आली असून ही सवलत सुधारित दरांवर लागू असणार आहे. तसेच, एसटी प्रवासासाठी प्रत्येक प्रवाशाकडून स्वच्छता शुल्क म्हणून दोन रुपये अतिरिक्त आकारले जाणार आहेत.
मुंबई, ठाणे आणि परिसरातून कोकणातील गाव-वाड्यांपर्यंत थेट जाण्यासाठी कोकणवासी मोठ्या प्रमाणावर एसटीला प्राधान्य देतात. गणेशोत्सवाच्या काळात दरवर्षी सरासरी पाच हजार बसेस आरक्षित केल्या जातात. कोकणवासीयांच्या मागणीचा विचार करून यंदा गणेशोत्सवासाठी एकेरी ग्रुप आरक्षणावर आकारण्यात येणारे ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक लवकरच एसटी प्रशासनाकडून जारी करण्यात येणार आहे.
एकेरी ग्रुप बुकिंगमध्ये - लग्न किंवा धार्मिक यात्रेसाठी एकेरी प्रवासाची ग्रुप बुकिंग केल्यास मूळ भाड्यापेक्षा ३० टक्के अधिक भाडे आकारण्यात येणार आहे. त्यामुळे एकेरी प्रवासासाठी बस आरक्षित करणाऱ्यांच्या खर्चातही वाढ होणार आहे. डिझेल, टायर, सुटे भाग, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांवरील वाढता खर्च लक्षात घेऊन एसटीच्या प्रवासी भाड्यात जुलैमध्ये १३.५६ टक्के वाढ करण्यात आली होती.