कास परिसरात २ ते ३ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती ; नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन; दुरुस्तीसाठी एक आठवड्याचा कालावधी लागणार

by Team Satara Today | published on : 25 December 2025


सातारा  : सातारा नगरपरिषदेच्या कास धरण उद्भव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, कास परिसरात २ ते ३ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने संबंधित गळती काढण्याचे काम नगरपरिषदेमार्फत सुरू करण्यात आले आहे. या दुरुस्ती कामासाठी सुमारे एक आठवड्याचा कालावधी लागणार असल्याची माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी दिली आहे.

या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. २६ डिसेंबर ते शुक्रवार दि. ०२ जानेवारी या कालावधीत सातारा शहरातील काही भागात पाणीपुरवठा कमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यामध्ये सायंकाळ सत्रातील कास माध्यमातील पोळ वस्ती, संत कबीर सोसायटी, डोंगराळ भागातील बालाजी नगर, कांबळे वस्ती, जांभळेवाडा परिसर तसेच कात्रेवाडा टाकी माध्यमातील भागांचा समावेश आहे. तसेच सकाळ सत्रातील पांढर हाऊस येथून होणारा यादोगोपाळ पेठ, मंगळवार पेठ परिसरातील तसेच कात्रेवाडी टाकी, गुरुकुल टाकी, व्यंकटपुरा टाकी, भैरोबा टाकी, कोटेश्वर टाकी या टाक्यांवर अवलंबून असलेल्या भागांमध्येही पाणीपुरवठा कमी प्रमाणात होण्याची शक्यता नगरपरिषदेने व्यक्त केली आहे.

दरम्यान, कास धरण उद्भव पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व भागांतील नागरिकांनी या कालावधीत पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा व नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन सातारा नगरपरिषदेमार्फत करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नगराध्यक्ष अमोल मोहिते आज पदभार स्वीकारणार; दोन्ही राजे राहणार उपस्थित, उपनगराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक निवडीकडे लक्ष
पुढील बातमी
साताऱ्यात २९ डिसेंबर रोजी रायगाव येथे विश्वव्यापी संत संमेलन व दर्शन महासन्मान सोहळा- घनश्याम छाबडा यांची माहिती

संबंधित बातम्या