पाटण : पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, मारूल हवेली परिसरातील गावात बिबट्याचा वावर चांगलाच वाढला आहे. नागरिकांना त्याचे वारंवार दर्शन होत असून बिबट्याकडून पाळीव प्राण्यावर हल्ल्याचे सत्र सुरूच आहे. तर बिबट्याचा दिवसाढवळ्या मुक्त संचार सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोंगर पट्ट्यात दिसणारा बिबट्या आता थेट गावात देखील दिसू लागला आहे. मल्हारपेठ, मारूल हवेली परिसरातील गावांत बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. तर हे दर्शन आता नित्याचेच बनले आहे. बिबट्या खाद्याच्या शोधात थेट गावात पोहचत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तर बिबट्या प्रत्यक्ष लोकवस्तीत दिसू लागल्याने ग्रामस्थांच्या चिंता वाढल्या आहेत. बिबट्याकडून शेळी, कोंबड्या सारख्या प्राण्यांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे येथील पशुधन धोक्यात आले आहे. तसेच परिसरातील पाळीव व भटकी कुत्रेही गायब झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
पूर्वी क्वचित दिसणारा बिबट्या आता वारंवार गावात दिसू लागल्याने ‘बिबटे सोडले जात आहेत का?’ असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. परिसरात बिबट्यांची वाढती संख्या, रस्त्यावर खुले वावरणे आणि गोठ्यात घुसून पाळीव जनावरे, कोंबड्यांवर हल्ला करण्याचे प्रकार यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वन विभाग मात्र अद्यापही कोणती ठोस कारवाई करत नसल्याची तक्रार ग्रामस्थांकडून होत आहे. यापूर्वी रात्रीच्या वेळेस दिसणार्या बिबट्याचे अलीकडच्या काळात दिवसाढवळ्या दर्शन होऊ लागले आहे. कधी भक्ष्याचा पाठलाग करताना मानवीवस्तीत येत बिबट्या हल्ले करू लागला आहे. त्यामुळे बिबट्याकडून नागरिकांवर देखील हल्ला होऊ शकतो.