सातारा : स्तनाच्या कर्करोगाबाबत व्यापक जनजागृती घडवून आणण्यासोबतच महिलांमध्ये नियमित फिटनेसचे महत्त्व रुजविण्यासाठी पिंकहोलिक इंडिया फाउंडेशनतर्फे साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पिंकथॉन डे रन’ला महिलांनी प्रचंड प्रतिसाद नोंदवला.
पिंकथॉनचे संस्थापक, प्रसिद्ध मॉडेल व अभिनेते मिलिंद सोमण तसेच अंकिता कोंवर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे नेतृत्व जयश्री शेलार यांनी केले. महिलांना धावण्यासाठी अथवा सहभागासाठी फार दूर जावे लागू नये या उद्देशाने मुख्य केंद्र असलेल्या लँडमार्क टॉवरसह यवतेश्वर, तामजाईनगर, निहालनगर, वाढे, देगाव फाटा, पिलेश्वरी, पिरवाडी, अजिंक्यतारा तसेच रहिमतपूर अशा विविध भागांत प्रत्येक पिनकोडनुसार रनर्ससाठी सुसज्ज नियोजन करण्यात आले होते. या दौडमध्ये सातारा शहर व परिसरातील हजारो महिलांनी आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांसह उत्साहाने सहभाग घेत कर्करोग जनजागृती आणि निरोगी जीवनशैलीचा प्रभावी संदेश दिला. धावण्याच्या माध्यमातून महिलांनी स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्याला प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त केला.
केवळ धावण्यापुरता मर्यादित न राहता या उपक्रमाला आरोग्याची भक्कम जोड देण्यात आली होती. या अंतर्गत ब्रेस्ट ऑन्कोलॉजिस्ट डॉ. स्नेहल पाटील यांच्या सहकार्याने आध्या ब्रेस्ट केअर सेंटरतर्फे महिलांसाठी मोफत स्तन तपासणी शिबिर घेण्यात आले. सोबतच ९ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींचे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण व्हावे यासाठी एचपीव्ही (HPV) लसीकरण शिबिराचेही यशस्वी आयोजन करण्यात आले. धावण्याच्या ऊर्जेसोबतच आरोग्य तपासणीची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम साताऱ्यात यशस्वी करण्यासाठी पिंकथॉन मेंटॉर नितेश भोसले, जयश्री शेलार, पिंकथॉन ॲम्बेसिडर माधुरी भोसले, पंकज दास, वाणीश्री हिरामट दास, डॉ. सोनल मुंढेकर, प्रिया तोरस्कर, मधुरा नलावडे, स्मिता देशमुख, दीपाली किर्दत, ज्योती गोरे, सीमा जाधव आणि स्मिता पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
जयश्री शेलार यांच्या नेतृत्वाखाली साताऱ्यात ‘पिंकथॉन डे रन’ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; मोफत तपासणी व एचपीव्ही लसीकरणाचा उपक्रम
by Team Satara Today | published on : 28 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा