सातारा : रोटरी क्लब ऑफ वाई, रोटरी क्लब ऑफ वेलबीईंग इंटरनॅशनल यांच्या पुढाकाराने, रोटरी फाउंडेशनच्या मदतीने जिल्हा रुग्णालयातील नवजात बालकांचा अतिदक्षता विभागामध्ये सुमारे ४८ लाख रुपयांची नवीन उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातील नवजात बाळांचा अतिदक्षता विभाग सक्षम झाला असून, अत्यावश्यक उपचारांसाठी जिल्ह्याबाहेर पाठवाव्या लागणाऱ्या बाळांवर तातडीने उपचार होण्यास मदत मिळणार आहे.
जिल्हा रुग्णालयातील लहान मुलांचा अतिदक्षता विभाग हा जिल्हा रुग्णालयातील एक महत्त्वाचा विभाग आहे. खासगी रुग्णालयांमध्ये नवजात बालकांना अतिदक्षता विभागात ठेवायचे म्हटल्यास दिवसाला हजारो रुपयांचा खर्च होतो. सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे अशा बालकांसाठी जिल्हा रुग्णालयातील ही सुविधा संजीवनी ठरते; परंतु जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा व जन्माला येणाऱ्या बाळांच्या संख्येचा विचार करता अतिदक्षता विभाग अपुरा पडत होता. शासनाकडून उपलब्ध असलेली साधणे कमी पडत होती. त्यामुळे अनेक बालकांना आवश्यकता असूनही अतिदक्षता विभागात दाखल करता येत नव्हते.
जिल्हा रुग्णालयातील या अडचणीबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी वाईच्या रोटरी ग्लोबल ग्रॅंट क्लबच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी तातडीने या कामासाठी मदत करण्याचे कबूल केले. त्यानुसार रोटरी फाउंडेशन व आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या मदतीने सातारा जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभाग सक्षम करण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत रोटरी ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर्स, वॉर्मर्स, फोटोथेरपी युनिट्स, मॉनिटर्स, इन्क्युबेटर्स व इन्फ्युजन पंप्स उपलब्ध करून देण्यात आले.
यामुळे या विभागाची क्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे. अपुऱ्या उपकरणांमुळे यापूर्वी पूर्वी अनेकदा लहान बाळे उपचारासाठी जिल्ह्याबाहेर पाठवावी लागत होती. या बाळांवर आता जिल्हा रुग्णालयातच उपचार होण्यास मदत होणार आहे.
या लहान बाळांच्या अतिदक्षता विभागाचे (NICU) लोकार्पण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या हस्ते नुकतेच झाले. या वेळी रोटरी प्रांतपाल सुधीर लातुरे, माजी प्रांतपाल स्वाती हेरकळ आणि डॉ. ओमप्रकाश मोतीपावले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे उपस्थित होते. या वेळी अनेक रोटेरियन, आरोग्य अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. रोटरी क्लबने केलेल्या या सकारात्मक कामाचे नागराजन यांनी या वेळी कौतुक केले.
रोटरीच्या ‘मातृ व बाल आरोग्य’ हा फोकस एरिया प्रत्यक्षात उतरवण्यात हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार असल्याचे प्रांतपाल सुधीर लातुरे यांनी या वेळी सांगितले. प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात प्रमोद शिंदे, डॉ. मनोहर दातार, मदन पोरे, डॉ. जितेंद्र पाठक, रोटरी क्लब वाईचे अध्यक्ष कुणाल शाह, सचिव अनुपम गाांधी यांचे विशेष सहकार्य लाभले.
या प्रकल्पाच्या उद्घाटनास दोनच दिवस शिल्लक होत. त्यापूर्वीच एका अत्यंत गंभीर अवस्थेतील नवजात बाळाला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्या बाळाला तातडीने एका मशिनची गरज होती. ते रोटरीच्या साहित्यात उपलब्ध होते. त्यामुळे रुग्णालयातील बालआरोग्य तज्ज्ञ डॉ. उल्का झेंडे यांनी रोटरी क्लबकडे हे मशिन वापरण्याबाबत विनंती केली. रोटरी क्लब ऑफ वाईने बाळाच्या जिवाला प्राधान्य देत त्याला लगेच संमती दिली. त्यामुळे प्रकल्पाचा उद्घाटनापूर्वीही नवजात बालके या यंत्रांच्या माध्यमातून उपचार घेऊ लागली.
रोटरीकडून नवजात बालकांचे प्राण वाचवण्यासाठी दिले गेलेले हे एक मोलाचे योगदान आहे. या सुविधांचा जास्तीतजास्त फायदा गरजूंना करून देण्यात येईल.
- डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक