पाणी द्या, नाहीतर पालिकेला टाळे ठोकू; समाधीचा माळ, गडकर आळीतील महिलांचा पालिकेत संतापाचा स्फोट

by Team Satara Today | published on : 17 June 2026


सातारा : गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळ पाण्याच्या तीव्र टंचाईने होरपळलेल्या समाधीचा माळ आणि गडकर आळी परिसरातील महिलांचा संताप बुधवारी अखेर पालिका भवनात उसळला. डोक्यावर हंडे, हातात निवेदने आणि ओठांवर तीव्र घोषणा घेऊन महिलांनी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

पालिका कार्यालयात पोहोचताच महिलांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना घेराव घालत प्रश्‍नांचा भडिमार केला. तीन जूनपासून नळ कोरडे आहेत, आमच्या घरात पाणी कधी येणार?, आमचे नगरसेवक कुठे लपले आहेत?, मत मागायला घरोघरी येणारे आता दिसत का नाहीत? अशा संतप्त प्रश्‍नांनी वातावरण तापले.

पाणीपुरवठा अभियंता शहाजी वाठारे यांच्यासमोर महिलांनी थेट आपली कैफियत मांडली. मागील आंदोलनावेळी नागरिकांना कार्यालयातून बाहेर काढण्यात आल्याची आठवण करून देत, त्या वेळी दमदाटी करणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहेत? असा रोखठोक सवाल महिलांनी उपस्थित केला.

परिसरात आधीच अपुरा पाणीपुरवठा होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून नळांना थेंबही नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी महिलांना मैलोनमैल भटकावे लागत असून खासगी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. मात्र जीवन प्राधिकरण आणि नगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावाचा फटका सर्वसामान्यांना बसत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

पाणी नाही तर कर कशासाठी?, जनतेला पाणी द्या, अन्यथा खुर्च्या खाली करा!, गायब नगरसेवकांचा शोध घ्या! अशा घोषणांनी पालिका परिसर दणाणून गेला. महिलांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली.

आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट इशारा देत सांगितले की, तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पुढील आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात करण्यात येईल. गरज पडल्यास पालिका कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

सातार्‍यातील पाणीटंचाईचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत असताना, नागरिकांचा संयम आता ढळत चालल्याचे चित्र या आंदोलनातून ठळकपणे समोर आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाचा दगडाने ठेचून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप व दंडाची शिक्षा
पुढील बातमी
दूध भेसळीवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन : स्वराज क्रांती संघटनेचा इशारा

संबंधित बातम्या