सातारा : पुणे येथे विषारी दारूमुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू, ताडी निर्मिती, वाहतूक व विक्रीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत 29 मे ते 2 जून 2026 या कालावधीत 42 गुन्हे नोंदविण्यात आले असून 34 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) श्री. प्रसाद सुर्वे तसेच विभागीय उपआयुक्त, कोल्हापूर विभाग श्री. विजय चिचांळकर यांच्या आदेशानुसार आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सातारा श्री. बाबासाहेब भुतकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.
विशेष मोहिमेसाठी पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली असून जिल्हाभर धडक कारवाया करण्यात येत आहेत. मोहिमेदरम्यान 451 लिटर हातभट्टी दारू, 853 लिटर ताडी तसेच 71.64 बल्क लिटर देशी-विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2 लाख 48 हजार 785 रुपये इतकी आहे.
अवैध मार्गाने तयार करण्यात येणारी हातभट्टी दारू, बनावट ताडी व इतर मद्यप्रकार नागरिकांच्या आरोग्यास आणि जीवितास गंभीर धोका निर्माण करू शकतात. राज्यातील काही ठिकाणी घडलेल्या दुर्दैवी घटनांमुळे हा धोका अधोरेखित झाला असल्याने नागरिकांनी अशा अवैध मद्याचे सेवन करू नये, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.
तसेच सातारा जिल्ह्यात कुठेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक किंवा विक्री होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधून तक्रार नोंदवावी. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे अधीक्षक श्री. बाबासाहेब भुतकर यांनी सांगितले.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही विशेष मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असून अवैध मद्यव्यवसायाविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.