लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकासाठी निधी देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करा

by Team Satara Today | published on : 26 October 2025


वाई : लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांचे सामाजिक व स्वातंत्र्य संग्रामातील योगदान मोलाचे आहे. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोकसंस्कृती देशभरात पोहोचवली. त्यांच्या जन्म गावी पसरणी येथे स्मारक उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. शाहीर साबळे यांच्या नावाला शोभेल व महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे स्मारक उभे करावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लोकशाहीर पद्मश्री कृष्णराव साबळे यांच्या स्मारकाच्या कोनशिलाचे अनावरण पसरणी, ता. वाई येथे उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, राधाबाई साबळे, यशोमती शिंदे, उदयसिंह पाटील-उंडाळकर, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीष पाटणे, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, राजाराम निकम, संजय साबळे, महंत सुंदरगिरी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शाहीर साबळे यांनी स्वातंत्र्य संग्रामात, गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम अशा विविध चळवळींमध्ये पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केली. शाहीर साबळे यांना लहानपणापासूनच गाण्यांचे बाळकडू वडिलांकडून मिळाले. साने गुरुजी, संत गाडगेबाबा यांच्यासह विविध दिग्गज मंडळींशी त्यांचा संपर्क आला. अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. शाहीर साबळे यांचे विचार पुढच्या पिढीला कळावे यासाठी प्रयत्न करावेत.

यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, पद्मश्री लोकशाहीर साबळे यांचे संयुक्त महाराष्ट्रात चळवतील योगदान व सामाजिक कार्य विसरता येणार नाही. त्यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे काम केले. शाहीर साबळे यांच्या शाहिरीची दिग्गज मंडळींनी नोंद घेऊन त्यांचे कौतुक केले. राष्ट्रपतींच्याहस्ते शाहीर साबळे यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पसरणी येथील शाहीर साबळे यांच्या स्मारकाला 30 कोटी निधी लागणार आहे. हा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करून शाहीर साबळे यांच्या नावाला साजेल असे स्मारक उभे केले जाईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.


कार्यक्रमास संपत महागडे, अनिल सावंत, भैय्या डोंगरे, बाळासाहेब चिरगुटे, यशवंत जमदाडे, प्रमोद शिंदे, महादेव मस्कर, राजेंद्र शेठ राजपुरे, चरण गायकवाड, भारत खामकर, भूषण गायकवाड, शशिकांत पवार, शैलेश देवकुळे, माऊली इंगळे, सत्यजित वीर, मनिष भंडारे, मोहन जाधव, अशोक गायकवाड, श्रीकांत सावंत, संग्राम पवार, संदीप नायकवडी, शंभू सर्यवंशी, भारत चव्हाण, प्रदिप जायगुडे, सचिन शिंदे, प्रसाद बनकर, धनंजय हगीर, प्रदिप चाेरगे, डॉ मंगेश महांगडे, सनी चव्हाण, धनंजय महांगडे, राजेश शिंदे, बाबूनाना महांगडे, आदींसह वाई, पसरणी, कुसगाव, एक्सर, विठ्ठलवाडी,व्याहळी येथील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी साहित्य संमेलनाला शासनामार्फत सर्व मदत करणार

सातारा जिल्हाविषयी आपुलकी असून प्रत्येक वेळी जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. या माध्यमातून सातारा येथील क्षेत्र माहुली घाटांचा विकास व सुशोभीकरण तसेच अजिंक्यतारा किल्ल्याचे ही संवर्धन केले जाणार आहे. बा.सी. मर्ढेकर यांचे मर्ढे येथील स्मारक पूर्ण झाले असून याचेही उद्घाटन लवकर करण्यात येईल. तसेच सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे या संमेलनाला शासनामार्फत सर्व ती मदत केली जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नाईकबोमवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; फलटण येथे १ हजार ३५२ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण
पुढील बातमी
जोपर्यंत मतदार याद्या व्यवस्थित शुद्ध होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत; प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे; महाविकास आघाडीची ठाम भूमिका

संबंधित बातम्या