आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधीचे फडणवीस यांना पत्र; आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐका

by Team Satara Today | published on : 26 August 2026


नागपूर : महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्या आणि विविध समस्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून थेट हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. गेल्या दहा दिवसांहून अधिक काळापासून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी पुण्यातील 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमात समस्या मांडल्यानंतर त्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्यासाठी राहुल गांधी यांनी हे पत्र लिहिले आहे.

राहुल गांधी यांनी पत्रात प्रामुख्याने आदिवासी वसतिगृहांचे जाचक नियम आणि तेथील बिकट परिस्थितीवर बोट ठेवले आहे. दूरवरच्या ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शहरांमधील शासकीय वसतिगृह हाच शिक्षणाचा मुख्य आधार असतो. मात्र, ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश न देण्याच्या नव्या नियमामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि उच्च शिक्षण घेणारे अनेक तरुण शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांनी स्वतः आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात आणि यावर तातडीने सन्मानजनक तोडगा काढावा, असे आवाहनही राहुल गांधी यांनी केले आहे.

राहुलजी, तुम्ही येण्यापूर्वीच आदिवासी विद्यार्थ्यांनी उपोषण सोडले होते : डॉ. अशोक वुईके

राहुल गांधी यांच्या टीकेला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात येण्यापूर्वीच नागपूर आणि चंद्रपूर येथील आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण मागे घेण्यात आले होते. कदाचित काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही माहिती त्यांना दिली नसावी. राहुल गांधी यांचे विधान दिशाभूल करणारे आणि राजकीय प्रसिद्धीसाठी असल्याचा पलटवार वुईके यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा ३० वर्षे करण्यात आली आहे. तसेच, सुट्टीवरून परतणाऱ्या विद्यार्थिनींकडून केवळ आरोग्याच्या कारणास्तव 'फिटनेस प्रमाणपत्र' घेतले जाते; गरोदरपणाची (गर्भावस्था) चाचणी घेतली जाते, हा दावा पूर्णपणे खोटा आणि तथ्यहीन आहे. ज्या आश्रमशाळांमध्ये समस्या किंवा सर्पदंशाच्या घटना घडल्याचा उल्लेख केला गेला, त्या माजी खासदार मारोतराव कोवासे आणि माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके या काँग्रेसच्याच नेत्यांच्या संस्था आहेत, असा घणाघात वुईके यांनी केला आहे.

वसतिगृहांची दुर्दशा आणि सुरक्षेचा प्रश्न

अनेक वसतिगृहांमध्ये मूलभूत सोयी-सुविधांचा मोठा अभाव आहे. योग्य अन्न, स्वच्छता आणि वैद्यकीय उपचारांअभावी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे ठिकाणी सर्पदंशासारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांना लागत आहे. काही जीवही गमवावा लागल्याची गंभीर बाब राहुल गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात अधोरेखित केली आहे.

विद्यार्थिनींच्या 'फिटनेस' टेस्टवरून संताप

विशेषतः महिला वसतिगृहांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी एका धक्कादायक नियमाचा उल्लेख केला आहे. दीर्घ सुट्टीनंतर परतणाऱ्या विद्यार्थिनींना 'फिटनेस' सिद्ध करण्यासाठी गरोदरपणाच्या चाचणीसह (प्रेग्नन्सी टेस्ट) विविध वैद्यकीय चाचण्या सक्तीच्या केल्या जात आहेत. हा प्रकार अत्यंत अपमानास्पद असून विद्यार्थिनींच्या मानवी हक्कांवर आणि आत्मसन्मानावर थेट गदा आणणारा आहे, असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; तीन अधिकाऱ्यांसह सहा जणांना अटक
पुढील बातमी
BA, BSc, B.Com पदव्या नोकरी देण्यास सक्षम नाहीत?; नीती आयोगाच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा, शिक्षण प्रणालीला अधिक नोकरी-केंद्रित बनवण्याची शिफारस

संबंधित बातम्या