सातारा : गेल्या दीड वर्षापासून वापराविना पडलेल्या सातारा पोलिसांच्या गृह संकुलांच्या वितरणाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. सातारा पोलिसांना आपल्या हक्काच्या घरात दिवाळी करता यावी यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सदनिकांची सोडत तातडीने सोडत घेऊन या घरांचे वितरण केले आहे. 698 संकुलापैकी 672 सदनिका पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आणि 24 सदनिका पोलीस अधिकाऱ्यांसाठी देण्यात आलेले आहेत.
तीनच दिवसापूर्वी पोलीस सदनिकांचे वितरण करण्यात आल्याने पोलिसांनी उत्साहाने घराचा ताबा घेऊन दिवाळी नव्या घरात साजरी केल्याचा आनंद त्यांना मिळाला आहे. दिवाळीचा आनंद पोलिसांना त्यांच्या हक्काच्या घरात साजरा करता यावा यासाठीच पोलीस सोडतीची प्रशासकीय प्रक्रिया मागील आठवड्यात घेऊन तीन दिवसांपूर्वीच त्यांचे वितरण करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे. नाशिकच्या ठेकेदार कंपनीकडून पोलीस संकुलांची देखणी कॉलनी उभी करण्यात आली होती. सातारा शहरालगतच्या डोंगर परिसरातून सातारा शहराचा नजारा बघितला तर पोलीस कॉलनीचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. मात्र गृह संकुलांच्या इमारती उद्घाटनाअभावी आणि पोलिसांना केलेल्या अर्जाच्या सोडती अभावी सारे प्रशासकीय गाडे अडकून पडले होते. तब्बल 19 महिने प्रशासकीय वसाहती तयार होऊन उभ्या होत्या. मात्र तांत्रिक कारणास्तव संकुल वितरणाचे काम अडखळले. पोलीस को-ऑपरेटिव्ह सोसायटी बोर्डाचे अध्यक्ष गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याने त्यांच्या हस्ते या संकुलांचे उद्घाटन घेणे नियोजित होते. मात्र मुख्यमंत्र्यांची कार्यव्यस्तता लक्षात घेता अद्यापही या संकुलाच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळालेला नाही.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याबाबत निर्देशित केल्याने साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी 14 ऑक्टोबर रोजी सोडत प्रक्रिया घेतली 572 घरांसाठी सुमारे 575 पेक्षा अधिक पोलिसांच्या अर्ज आले होते. या सोडती पैकी 98% कर्मचाऱ्यांना संकुलाचा ताबा सोडतीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे .या सदनिकांचे वितरण करताना ज्यांचे वय 50 वर्षापेक्षा जास्त आहे अशा पोलीस कर्मचाऱ्यांना पहिला व दुसरा मजला कटाक्षाने देण्यात आलेला आहे .पोलीस वसाहतीमध्ये एकूण बारा इमारती असून प्रत्येक इमारतीमध्ये 56 फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत. 572 सदनिका या पोलीस हवालदार अंमलदार यांना देण्यात आलेले असून बी विंग मधील 24 सदनिका या सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत .तर दोन गृह संकुले ही दोन उपअधीक्षक पदासाठी ठेवण्यात आलेले आहेत.गृह संकुलांच्या सोडतीचा विषय मार्गी लागून पोलिसांना घरांचा ताबा मिळाल्याने त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.