फ्लॅटच्या अमिषाने तब्बल 30 लाखांची फसवणूक; एकास अटक

by Team Satara Today | published on : 01 September 2024


सातारा : सातार्‍यातील गुरुवार पेठेत इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 30 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी अमर सतिश देशमुख (रा.सदरबझार, सातारा) या बिल्डर विरुध्द गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता 3 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पंकज भागवत मिसाळ (रा.संभाजीनगर, सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फसवणूकीची घटना 2021 साली घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार पंकज मिसाळ यांची अमर देशमुख याच्याशी व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झाली होती. अमर देशमुख याने गुरुवार पेठेत इमारत बांधकाम परवानगी घेवून काम सुरु केले होते. मात्र 2021 साली त्याला काही व्यावसायिकांची थकबाकी देणी झाली होती. ती देणी देण्यासाठी व प्रकल्प वेळेत पूर्ण करणेसाठी अमर देशमुख याने पंकज मिसाळ यांना भेटून ’सह्यादी हाईटस’ या प्रकल्पातील पहिल्या मजल्यामधील दोन फ्लॅट विकत घेण्याची विनंती केली. त्यानुसार 40 लाख रुपये रकमेचा व्यवहार दोघांमध्ये ठरला.
फ्लॅट घेण्यासाठी लागणारी व्यवहाराची रक्कम अमर देशमुख याने तक्रारदार मिसाळ यांना संबंधित रक्कम इमारत बांधण्यासाठी ज्या व्यवसायिकांकडून साहित्य घेतले होते, त्या व्यवसायिकांना पाठवण्यास सांगितले. त्यानुसार मिसाळ यांनी 7,50,000 रुपये स्टील, 4 लाख रुपये सिमेंट, 11 लाख रुपये लेबर, सेट्रिंग, 3 लाख रुपये मुरूम सप्लायर्स, 2 लाख 50 हजार रुपये स्टोन क्रशर 1 लाख रुपये तसेच बोअरवेल व्यवसायिक यासह इतर व्यवसायिकांना रकमा पाठवल्या. याबाबतचे सर्व पुरावे तक्रारदार पंकज मिसाळ यांच्याकडे आहेत. अशाप्रकारे 40 लाख रुपयांपैकी 30 लाख रुपये दिले. दोन्ही फ्लॅटचे खरेदीपत्र करून देण्याचे बंधनकारक होते. मात्र आजतागायत प्रत्यक्ष जागेवर आर.सी.सी कॉलम उभे करण्या व्यतिरिक्त अन्य कोणतेही काम झालेले नाही. तक्रारदार यांनी डिसेंबर 2022 पासून वेळोवेळी समक्ष भेटून फ्लॅट द्या किंवा आमचे आम्हाला पैसे परत द्या, अशी विनंती केली. मात्र उडवाउडवीची उत्तरे देवून त्यांची फसवणूक करण्यात आली.
फसवणूक झाल्याने तक्रारदार पंकज मिसाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. शनिवारी पोलिसांनी तक्रार ऐकून घेवून अमर देशमुख याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण विभागाने (डीबी) त्याला तात्काळ अटक केली. रविवारी अमर देशमुख याला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जगप्रसिध्द सातारा हिल हाफ मॅरेथॉनचा खा. उदयनराजेंच्या हस्ते शानदार शुभारंभ
पुढील बातमी
जुगार प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या