सातारा : घटस्थापना म्हणजे भक्ती शक्तीचा चैतन्यमय उत्सव. या उत्सवाला दिनांक 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होत आहे. यामुळे बाजारपेठेत रेलचेल वाढली असून घटासह माती आणि इतर पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी राजवाडा परिसरातील बाजारपेठेत नागरिकांची गर्दी उसळली आहे. आनंद व मांगल्याचे प्रतीक असलेल्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना जवळ आल्याने दुर्गा भक्तांमध्ये उत्साह वाढला आहे.
सर्वपित्री अमावस्याने पितृपक्षाची सांगता होत आहे. दुसर्या दिवशी गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी घटस्थापनेने नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. यासाठी अवघे जनजीवन आतुरले असून सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांच्या देवीची प्रतिष्ठापना तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रथा परंपरा व देवीची उपासना यांचे पावित्र्य राखण्यासाठी जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाची तयारी केली जात आहे. मंडप उभारणी, सजावट, विद्युत रोषणाई, देखावे इत्यादी कामे पूर्णत्वाला आली आहेत. सातारा शहरातील 32 मंडळांनी आतापर्यंत मंडप उभारणीची परवानगी घेतली आहे.
आजपासून सुवासिनींचे बारा दिवसाचे उपवास सुरू होत असल्याने फळ बाजारात फळासह उपवासाच्या पदार्थांना मोठी मागणी आहे. ज्यांना सलग उपवास होत नाही ते बसता उठताचे उपवास करतात. रताळी, शेंगदाणे, बटाटे यांचे दर सध्या अवाक्यात असल्याने सर्वसामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सातारा शहरातील भारत माता नवरात्रौत्सव मंडळासह विविध मानांच्या देवीचे वाद्याच्या गजरात मिरवणुकीने आगमन यापूर्वी झाले आहे. ग्रामीण भागात मंदिरात घटस्थापनेची जय्यत तयारी सुरू असून दुर्गा प्रतिष्ठापनासाठी स्वच्छता होत आहे. वेगवेगळ्या मंडळांनी मांडवांना विद्युत रोषणाईची झळाळी दिली आहे. अश्विन शुक्ल तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने यावर्षी नवरात्र उत्सव दहा दिवसांचे असणार आहे. गुरुवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी ब्रह्म मुहूर्तापासून पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी 1:45 मिनिटापर्यंत घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त आहे. या शुभ काळादरम्यान वेळेत घटस्थापना करून नवरात्रीचे पूजन करता येईल. 11 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी व नवमीला उपास सोडणार आहेत. 12 ऑक्टोबर रोजी सिमोल्लंघनाने विजयादशमी साजरी होणार आहे.