सातारा : सातारा शहरातील पोवई नाका परिसरातील शिक्षक बँकेशेजारी चालविल्या जाणार्या ‘हॉटेल वसंत भोजनालय’वर दोष आढळल्यास तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे पोवई नाका परिसरातील व्यापार्यांकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे. 10 ऑगस्ट 2026 रोजी नगराध्यक्षांना सादर करण्यात आलेल्या या पत्रात नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ आणि पक्षपाती कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
या प्रकरणी तक्रारदारांनी नमूद केले आहे की, नगररचनाकार मदने यांनी या अनधिकृत भोजनालयाला केवळ नोटीस बजावण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. संबंधित भोजनालय दोषी असूनही त्यांच्यावर कारवाई करण्यास जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नगरपरिषद प्रशासनाने सर्वसामान्य नागरिक आणि श्रीमंत वा धनदांडगे असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान न्याय दिला पाहिजे.
तक्रारदारांच्या मते, हा हॉटेल व्यवसाय सुजित आंबेकर यांचे कुटुंबीय चालवत आहेत. स्वतःला तत्वज्ञानी म्हणवून घेणारे आणि इतरांना नियम व कायद्याचे धडे देणार्यांच्या घरातच नियमांचे उल्लंघन होत असून हा प्रशासकीय दृष्टीने अत्यंत गंभीर प्रकार आहे. त्यामुळे नगरपरिषदेने कोणतीही मुलाहिजा न बाळगता या बेकायदेशीर व्यवसायावर तात्काळ कठोर कारवाई करून सातारकरांना पारदर्शक प्रशासनाचा प्रत्यय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
प्रमोद जाधव, विजय येवले, ओम जाधव आणि दत्तात्रय दळवी यांनी या मागणी पत्रावर स्वाक्षर्या केल्या असून, जर सातारा नगरपरिषदेने या प्रकरणावर तातडीने योग्य ती कारवाई केली नाही, तर महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाकडे दाद मागण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे पत्र 11 ऑगस्ट 2026 रोजी नगरपरिषद बारनिशी शाखेत अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहे.