कोरेगाव : मोटरसायकलच्या अपघातात जखमी झालेल्या बिचुकले ता. कोरेगाव येथील प्रतीक चंद्रकांत पवार (वय २७) या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रतिकचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाठार पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत वाठार पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि. ११ ऑक्टोबर रोजी प्रतीक पवार हा वाठार स्टेशनहून मोटरसायकल क्रमांक (एमएच ११ डी डब्ल्यू ९८५२) वरून घरी बिचुकले येथे निघाला होता. सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान तळीये बिचुकले गावच्या हद्दीत आल्यानंतर रस्ता खडबडीचा असल्याने प्रतीक याचा मोटरसायकल वरील ताबा सुटल्याने रस्त्यावर पडला. या अपघातात प्रतीक याच्या डोक्यास गंभीर मार लागल्यामुळे तो बेशुद्ध पडला.
या घटनेची खबर मिळताच वाठार पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले. गंभीर जखमी अवस्थेत प्रतिक यास उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान शनिवार दि. १८ रोजी त्याचा मृत्यू झाला. मृत प्रतीक हा शिवसेना शिंदे गटाचे तालुका उपप्रमुख चंद्रकांत पवार यांचा एकुलता एक मुलगा होता. रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अंत्यविधीस कोरेगाव खटावचे आमदार महेश शिंदे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल बर्गे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल कदम तसेच राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता.