पाटण तालुक्यात घरात टीव्ही पाहत बसलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत, परिसरात भीतीचे वातावरण

by Team Satara Today | published on : 02 November 2026


पाटण : सळवे विभागातील एकावडेवाडीनजीकच्या निनाईनगर- येळवेवाडी (ता. पाटण) येथे रात्रीच्या सुमारास घरात घुसलेल्या बिबट्याने एकावर हल्ला करून जखमी केल्याचा प्रकार रात्री पावणेआठच्या सुमारास घडला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण आहे.
याबाबत माहिती अशी, सळवे विभागातील अनेक वाड्यावस्त्यांवर बिबट्याचा उपद्रव कायम आहे. काल तेथील एकावडेवाडीनजीकच्या येळवेवाडीत बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली. माजी सरपंच भगवान शंकर एकावडे (वय ६०) यांचे घर भरवस्तीत आहे. काल रात्री पावणेआठच्या सुमारास घरातील महिला घराच्या मागील दाराला भांडी घासत होत्या.
त्यावेळी अंधारातून बिबट्या घराच्या पडक्या भिंतीतून आत आल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी घाबरून आरडाओरडा केला. त्यावेळी घराच्या पत्र्यावरून थेट आत उडी घेत बिबट्याने घरात टीव्ही बघत बसलेल्या भगवान एकावडे यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे श्री. एकावडे घाबरून गेले. महिलांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोकही घटनास्थळी धावले.
त्यामुळे श्री. एकावडे यांची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली. बिबट्या तेथून पसार झाला. जखमी एकावडे यांना ग्रामस्थांनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्या डोक्याला बिबट्याने पंजा मारल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल राजेश नलवडे, त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सरकारने झाडाझुडपासकट महाराष्ट्र विकायला काढला; ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांची सरकारवर टीका; नागपुरातून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

संबंधित बातम्या