दिल्ली : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी पोहोचले आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी दिल्ली दौरा केला होता. सलगच्या दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात येत आहे. अशातच एकनाथ शिंदे पुन्हा दिल्लीत गेल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.
उद्धव ठाकरे बुधवारी दिल्लीला निघाले. राहुल गांधींना भेटायचंय, इंडिया आघाडीच्या कॅम्पात हजेरी लावायची आहे, पण इकडे उपमुख्यमंत्री शिंदे ही काही कमी नाहीत? 'आधी मी!' म्हणत तेही दिल्लीच्या दिशेने झेपावलेत. दिल्लीच्या विमानतळावरच 'पहिले दर्शन कोणाचे?' अशी अघोषित शर्यतच जणू! राजकारणात दिल्ली वारी म्हणजे काही निव्वळ औपचारिकता नव्हे. भेटीगाठींच्या आडून नवी समीकरणं ठरत असतात. जुनी नाती मोडकळीस येतात. नवी नाती जन्म घेतात. त्यामुळे उद्धव-राहुल यांची भेट ही कुणासाठी धडकी भरवणारी ठरणार? शिंदे यांचे 'वॉर रूम' प्लॅन कोणाचे समीकरण बदलणार? हे पाहणं रंजक ठरणार आहे. राजकारण म्हणजे काय, तर सही टायमिंगची मॅच, नाही का? अशी कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीची एक महत्त्वाची बैठक दिल्लीत होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे जाणार आहेत. या दिल्ली भेटीत उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे ६ ते ८ ऑगस्ट दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. ७ ऑगस्टला राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची बैठक आहे. या बैठकीत राज-उद्धव एकत्र येण्यावर चर्चा झालीच तर काँग्रेस आणि अन्य पक्षांची मनसेला सोबत घेण्याबाबत काय भूमिका असेल? ही युती सहज स्वीकारतील? वेळ आलीच तर उद्धव हे राज यांच्यासाठी आघाडीवर 'पाणी सोडण्याची' तयारी दाखवतील का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.