महाराष्ट्र आरोग्य मित्र संघटनेचे धरणे आंदोलन

विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर

सातारा : आरोग्य मित्र हा आरोग्य विभागातील सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे. मात्र त्यांना पुरेसे वेतन आणि तेही वेळेवर दिले जात नाही, या विविध मागण्यांकरिता आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्या निमित्ताने साताऱ्यात सुमारे 50 आरोग्य मित्र सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नमूद आहे की, आरोग्य मित्रांना दरमहा २६ हजार रुपये वेतन व किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता द्यावा. वेतनामध्ये दरवर्षी दहा टक्के वाढ करण्यात यावी, या विविध मागण्यांसाठी त्यांचा गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आरोग्य योजना या विविध प्रक्रियेमध्ये आरोग्य मित्र सेवकांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र शासकीय लाभापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिला आहे.


मागील बातमी
सर्कलवाडी येथे एआय (AI) तंत्राद्वारे डाळिंब लागवडीचा प्रयोग
पुढील बातमी
जय शिवाजी जय भारत रॅलीचे आयोजन

संबंधित बातम्या